पणजी : ६० टक्के प्रश्नांची उत्तरे अजून प्रतीक्षेत असल्यामुळे विरोधकांनी विधानसभेत जोरदार हरकत घेतली. प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला तेव्हा प्रश्नोत्तरे सुरू होण्यापूर्वी अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी हा मुद्दा उपस्थित केला. नियमाप्रमाणे प्रश्नांची उत्तरे सदस्यांना कामकाज सुरू होण्याच्या ४८ तासांपूर्वी मिळायला हवीत. असे असताना ४८ तास होऊन गेले तरी सदस्यांना आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत, असे आढळून आले आहे. विजय सरदेसाई, दिगंबर कामत यांनी ही गोष्ट सभागृहाच्या नजरेस आणून दिली. मुद्दा उपस्थित केला होता सरदेसाई यांनी. या प्रश्नी सभापतींनी निवेदन द्यावे, असा त्यांचा आग्रह होता. केवळ विरोधी सदस्यच नव्हे तर सत्ताधारी सदस्यांनाही त्याच परिस्थितीला सामोरे जावे लागल्याचेही नंतर आढळून आले. सावर्डेचे भाजपा आमदार गणेश गावकर यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कामकाज सुरू झाले तरीही मिळाले नव्हते. प्रश्न उपस्थित करण्यास मान्यता नाही, असे उत्तर त्यांना अगोदर आले व नंतर उत्तर प्रतीक्षेत आहे असे उत्तर आले. सभागृहाला त्यांनी ही माहिती देताच अपक्षांसह विरोधी सदस्यांनीही त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल कौतुक केले आणि सभापतींकडून निवेदन मागितले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी हस्तक्षेप करताना विरोधकांनी उपस्थित केलेला मुद्दा हा गंभीर असल्याचे सांगितले. ६० टक्के प्रश्नांची उत्तरे जर प्रतीक्षा यादीत गेली आहेत तर ती बाब अत्यंत गंभीर असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
६० टक्के प्रश्नांची उत्तरे प्रतीक्षा यादीत
By admin | Published: July 26, 2016 2:39 AM