लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : मांद्रे मतदारसंघातील सर्व पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य यांच्यासोबत आमदार जीत आरोलकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आराखड्याबाबत सोमवारी ९ वा. पर्यंत आपण योग्य निर्णय घेईन व त्यासंदर्भात कळविले जाईल, असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री योग्य अंमलबजावणी करतील आणि सोमवारी आम्हाला जनहिताचा निर्णय कळवेल, असा विश्वास आमदार आरोलकर यांनी व्यक्त केला. मात्र, जनहिताविरोधात निर्णय गेला, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आरोलकर यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना दिला.
पेडणे तालुक्यातील पंचायतमंडळ, स्थानिकांना विश्वासात न घेता जमीन रूपांतरित नवीन आराखडा कच्चा आराखडा सादर केला. तो आराखडा सरकारने त्वरित रद्द करून स्थानिकांना हवा तसा आराखडा तयार करून द्यावा, यासाठी आमदार आरोलकर यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक सभेला उपस्थित होते.
रविवार दि. ८ रोजी भाऊसाहेब बांदोडकर उद्यान परिसरात आयोजित केलेल्या सभेला तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप, गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, केरी सरपंच धरती नाईक, पालयेचे माजी सरपंच सागर तिळवे, हरमलचे सरपंच बर्नार्ड फर्नांडिस, माजी सरपंच डॅनियल डिसोझा, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर, मांद्रे सरपंच अमित सावंत, तारा हडफडकर, आगरवाडा, तुये, विनडा भागातील सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मांद्रे सरपंच अमित सावंत यांनी सांगितले, आमदार जीत आरोलकर हे एकटे नाहीत. त्यांच्यासोबत पेडणे तालुक्यातील जनता आहे आणि जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आमदाराला आहे. तोपर्यंत आमदाराने घाबरण्याची गरज नाही. यावेळी मांद्रे पंचसदस्य प्रशांत नाईक यांचे मार्गदर्शन करणारे भाषण झाले.
मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी सांगितले, जनतेमध्ये फूट पाडणाऱ्या लोकप्रतिनिधीला अगोदर धडा शिकवण्याची गरज आहे. पेडणे मतदारसंघाचा आमदार कुठे गेला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांनी सांगितले, जनतेला हवा तसा आराखडा तयार करा. वातानुकूलित कार्यालयात बसून जनतेला गृहित धरून आराखडा तयार करू नका. जनतेच्या हितासाठी आता आम्हीही रस्त्यावर यायला तयार असल्याचे जिल्हा सदस्य सतीश शेटगावकर यांनी सांगितले. गोवा फॉरवर्ड नेते दीपक कळंगुटकर, संदेश सावंत, हरमलचे माजी सरपंच डॅनियल डिसोझा व इतरांनी विचार मांडले.
मांद्रेवासीयांवरील अन्याय सहन नाही करणार
आमदार जीत आरोलकर यांनी पुन्हा पुनरुचार करताना आपल्यावर अन्याय झाला, तर आपण एकवेळ सहन करीन. मात्र, मांद्रेवासीयांवर झालेला अन्याय कदापि सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिले, ते नक्की पाळतील, असा विश्वास आमदार आरोलकर यांनी व्यक्त केला.
आंदोलनाला पाठिंबा, जनतेसोबत राहीन: खलप
माजी केंद्रीय मंत्री अँड. रमाकांत खलप यांनी आराखड्याविरुद्ध आंदोलनाला पाठिंबा दिला. ज्या पद्धतीने आराखडा तयार केला आहे. तो दिल्लीस्थित व्यावसायिकांच्या आणि रियल इस्टेटचे भले करण्यासाठी आहे. आराखड्याविरुद्ध जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.