कोंकणीसाठी जागे व्हा; गोव्यातील विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे भाजप सरकारला आवाहन
By सूरज.नाईकपवार | Published: January 18, 2024 11:56 AM2024-01-18T11:56:56+5:302024-01-18T11:58:13+5:30
नामवंत कोंकणी कवी मनोहरराय सरदेसाई यांच्या १००व्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात केलं विधान
सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: कोंकणी उलय, कोंकणी बरय, कोंकणीतल्यांन सरकार चलय हे ब्रीदवाक्य आचरणात आणून, नामवंत कवी मनोहरराय सरदेसाई यांची जन्मशताब्दी साजरी करूया. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप सरकाराने कोंकणीसाठी जागे व्हावे असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी नामवंत कोंकणी कवी मनोहरराय सरदेसाई यांच्या१०० व्या जयंतीनिमित्त स्मरण करताना केले आहे.
मनोहरराय सरदेसाई यांचा जन्म १८जानेवारी १९२५ रोजी झाला. कालपासून साहित्य अकादेमी पुरस्कार विजेत्या गोव्यातील महान कवीचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. गोवा सरकारने हे वर्ष राजभाषा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून साजरे केले पाहिजे, असे ते म्हणाले.
या महान कवीवर्याचे शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी भाजप सरकारकडे काही निधी उपलब्ध असेल अशी मला आशा आहे. वायफळ इव्हेंट आयोजित न करता, आजच्या तरुण पिढीला मनोहरराय सरदेसाईंनी साहित्य क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाची माहिती करुन देणारे कार्यक्रमच आयोजित करावेत असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.आज केवळ इव्हेंट आयोजनाच्या ध्यासाने वेडे झालेल्या भाजप सरकारला महान गोमंतकीयांचा विसर पडला आहे, हे दुर्दैव आहे. गोवा सरकारने आज मनोहरराय सरदेसाईंच्या स्मरणार्थ एक अधिकृत कार्यक्रम आयोजित करायला हवा होता, असे ते म्हणाले.
गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याने कला, संस्कृती व साहित्य क्षेत्रात योगदान दिलेल्या सर्व महान गोमंतकीयांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या तारखांसह एक निर्देशिका तयार करावी अशी मागणी त्यांनी केली. मनोहरराय सरदेसाईंच्या गोंयकारानो जायात जागे या कवितेतील प्रत्येक शब्दातून आपण प्रेरणा घेत पूढे येण्याची वेळ आली आहे. भाजप सरकारने आपल्या लोकविरोधी धोरणांनी निसर्गरम्य गोवा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने गोव्याची अस्मिताच पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. गोवा वाचविण्यासाठी गोमंतकीयांनी परत एकदा उठून उभे राहणे गरजेचे आहे, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.