पणजी : अवयवदान आणि देहदान याबाबत लोकांमधील अंधश्रध्दा दूर होत चालल्याचे आशावादी चित्र दिसत असल्याचा दावा फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेचे मुख्य प्रवर्तक पुरुषोत्तम पवार यांनी केला. यापुढे गुजरात व कर्नाटकमध्येही अवयवदानाबाबत जागृतीसाठी पदयात्रा काढण्याचा संकल्प संस्थेने सोडला आहे.
मुंबई ते गोवा ५२ दिवसांची जागृती पदयात्रेचा समारोप मडगांव येथे झाल्यानंतर सोमवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २३ फेब्रुवारी रोजी मुंबईतील केईएम इस्पितळाकडून ही पदयात्रा सुरु झाली होती. तब्बल ५२ दिवसांनी ती गोव्यात पोचली आणि मडगाव येथे समारोप झाला. गोवा आणि कोकण भागात अवयवदान आणि देहदानाबाबत लोकांमध्ये गैरसमज असल्याचे आढळून आल्याने ही पदयात्रा आयोजत करुन जनजागृती घडवून आणल्याचे पवार यांनी सांगितले. गोव्यात मोहन एस. राव हे संस्थेचे काम पुढे नेतील तर उमेश ढवळीकर हे अॅम्बेसिडर म्हणून काम पाहतील.
हातांचे यशस्वी रोपण फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेच्या खजिनदार मीरा सुरेश यांनी अशी माहिती दिली की, हृदयविकाराने निधन झाल्यास डोळे आणि त्त्वचा सहा तासांच्या आत दान करता येते तसेच देहदान करता येतो. केरळमध्ये ब्रेन डेड घोषित केलेल्या व्यक्तीचे हातही काढून अन्य गरजू रुग्णावर त्याचे रोपण करण्यात आलेले आहे. मुंबईच्या केईएम इस्पितळात हातांचे रोपण यशस्वीरित्या झालेले आहे. ब्रेन डेड व्यक्तीचे देहदान करता येत नाही. हृदय चार तासांच्या आत, यकृत ८ तासांच्या आत तर फुफ्फुसे १२ तासांच्या आत रोपणासाठी वापरणे शक्य आहे. १९९४ चा मानवी अवयव रोपण कायदा वेळोवेळी गरजेनुसार दुरुस्त करण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात गेल्या वर्षी ५२ ब्रेन डेड व्यक्तींचे अवयव इतर गरजू रुग्णांसाठी वापरण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पवार म्हणाले की, गेल्या वर्षी नाशिक ते नागपूर आणि पुढे बाबा आमटे आश्रमापर्यंत अशी ५२ दिवसांची पदयात्रा काढण्यात आली होती. मुंबई-गोवा पदयात्रेत अनेक अनुभव आले. रत्नागिरी जिल्ह्यात इस्पितळांमध्ये अवयवदान किंवा देहदानासाठी कोणत्याच सुविधा नसल्याचे आढळून आले. काही ठिकाणी धार्मिक बाबी आडव्या येतात परंतु आता लोकांमधील अंधश्रध्दाही दूर होत चालल्याचे आशावादी चित्र दिसत असल्याचे पवार म्हणाले.
मीरा सुरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत अवयवदान तसेच देहदानासाठी ३३ इस्पितळे तेथील आरोग्य खात्याकडे नोंदणीकृत आहेत. इस्पितळे तसेच डॉक्टरनी या कामासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. ‘रोटो’खाली गोव्याची अजून नोंदणी झालेली नाही. ही प्रक्रिया अजून चालू आहे. ‘रोटो’खाली महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्ये येतात. पत्रकार परिषदेस गोव्याचे संघटक मोहन राव हेही उपस्थित होते.