मडगाव: ड्रग्स प्रकरणात गुरुवारी क्राईम ब्रँचने पकडलेला व्हेली डिकॉस्ता हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने केपे न्यायालयाने त्याला जामिनावर मुक्त केले. ही कारवाई होण्याच्या 7 दिवसांपूर्वी तो पॉझिटिव्ह आढळून आला होता. ड्रग्स व्यवहारात हात असल्याच्या आरोपावरून व्हॅलीला गुरुवारी रात्री क्राईम ब्रँचने त्याच्या तिळामळ केपे येथील घरातून उचलले होते. त्यावेळी त्याच्याकडे 40 हजारांचा गांजा सापडला होता.
शुक्रवारी त्याला रिमांडसाठी केपे न्यायालयासमोर हजर केले असता तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर त्याने न्यायालयाने जामिनावर मुक्त करताना 5 दिवस क्राईम ब्रँचच्या कार्यालयात हजेरी देण्याबरोबर आरोपपत्र दाखल करेपर्यंत महिन्यातून एकदा हजेरी लावण्याची अट घातली.
व्हॅली डिकॉस्ता याला यापूर्वीही ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती-
दरम्यान गोव्यात गांजाशी निगडित प्रकरणे वाढत असून चालू ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 10 दिवसातच ड्रग्स संधार्भात 8 प्रकरणे उघडकीस आली असून त्यातील सहा प्रकरणे गांजाशी निगडित आहेत. 5 ऑक्टोबर रोजी पेडणे पोलिसांनी मांद्रे येथे एका घरावर धाड घालून दोन रशियन नागरिकांना अटक केली होती. त्यावेळी ते घरातच गांजाची लागवड करत असल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्या घरातून 2.50 लाख किमतीचा अडीच किलो गांजा पकडला होता.
2 ऑक्टोबर रोजी काणकोण येथे मूळ आंध्रप्रदेश येथील एका सॉफ्टवेअर अभियंत्याला अटक केली असता त्याच्याकडे 12 हजारांचा गांजा सापडला. 4 ऑक्टोबर रोजी कलांगुट आणि बेतोडा (फोंडा) या दोन ठिकाणी झालेल्या कारवाईत दोन स्थानिकाकाडून 32 हजारांचा गांजा मिळाला होता. 7 ऑक्टोबर रोजी कलांगुट येथे दोन हैद्राबादी युवकांना अटक केली असता त्यांच्याकडे 80 हजारांचा गांजा सापडला होता. या महिन्यातील अन्य दोन प्रकरणे चरसशी निगडित आहेत.