पणजी : राज्यातील एक-दोन पालिका वगळता अन्य सर्व नगरपालिकांच्या निवडणुका येत्या आॅक्टोबरमध्ये होणार आहेत. तत्पूर्वी या सर्व पालिकांची प्रभाग संख्या सरासरी २५ टक्क्यांनी वाढविली जाईल, असे उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. येथे ‘लोकमत’शी बोलताना डिसोझा म्हणाले की, सध्या पालिका प्रभागांमधील मतदारांच्या संख्येत समानता नाही. एका प्रभागात तीन हजार मतदार आहेत, तर दुसऱ्या प्रभागात दीड हजार मतदार आहेत. येत्या दोन-तीन महिन्यांत पालिका प्रशासन खाते राज्यातील पालिकांच्या प्रभाग फेररचनेची प्रक्रिया सुरू करील. प्रत्येक पालिकेच्या प्रभागांची संख्या त्या पालिकेच्या दर्जानुसार वाढेल. डिसोझा म्हणाले की, अ गटातील ज्या पालिकांची प्रभाग संख्या सध्या २० आहे, त्यांची २५ केली जाईल. ब गटातील ज्या पालिकांच्या प्रभागांची संख्या सध्या १५ आहे, त्यांची २० केली जाईल. क वर्गातील पालिकांची प्रभाग संख्या सध्या १० असून ती संख्या १५ केली जाईल. एकंदरीत प्रत्येक पालिकेची प्रभाग संख्या पाचने वाढविली जाईल. तसेच मतदारांचे प्रमाण सर्वसाधारणपणे विभागून दिले जाईल. सध्या महिलांना ३३ टक्के, ओबीसींना २७ टक्के, अनुसूचित जमातींना १२ टक्के व अनुसूचित जातींना २ टक्के आरक्षण आहे. सर्वसाधारण वर्गातील लोकांना त्यामुळे प्रभाग संख्या कमी पडतेय. एकदा प्रभागांचे प्रमाण वाढल्यानंतर ही अडचण दूर होईल. (खास प्रतिनिधी)
पालिकांचे प्रभाग २५ टक्के वाढणार
By admin | Published: March 11, 2015 3:09 AM