'वो तो ट्रेलर था, पिक्चर कल बाकी है'; काँग्रेसचा पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 02:10 PM2019-11-27T14:10:51+5:302019-11-27T14:11:02+5:30
गेल्या २० रोजी जावडेकर इफ्फीच्या उद्घाटन समारंभासाठी आले असतात सभागृहात काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांनी यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने तिघांना अटक करण्यात आली होती
पणजी : म्हादईच्या प्रश्नावर काँग्रेसने केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना उद्या इफ्फीच्या समारोप समारंभाला गोव्यात उपस्थित न राहण्यासंबंधी पुन्हा एकदा बचावले असून "वो तो ट्रेलर था, पिक्चर कल बाकी है" , असा इशारा दिला आहे. म्हादई नदीवर कर्नाटककडून बांधण्यात येत असलेल्या कळसा-भांडुरा प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणीय परवान्याच्याबाबत मुभा देणारे जे पत्र दिले आहे ते मागे घेतल्याशिवाय गोव्यात पाय ठेवूच नका, असा इशारा जावडेकर यांना देण्यात आलेला आहे.
गेल्या २० रोजी जावडेकर इफ्फीच्या उद्घाटन समारंभासाठी आले असतात सभागृहात काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांनी यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने तिघांना अटक करण्यात आली होती. इफ्फीचा समारोप सोहळा उद्या असून या कार्यक्रमालाही जावडेकर उपस्थित राहणार आहेत. कॉंग्रेसचे प्रदेश युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर म्हणतात की, सोशल मीडियावर आज जारी करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये "वो तो ट्रेलर था, पिक्चर कल बाकी है" असे लिहीण्यात आले आहे. केंद्रिय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर इफ्फिच्या सांगता सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता गृहित धरुन, गोमंतकीयांच्या भावना परत एकदा त्यांच्या पर्यंत पोचाव्यात म्हणून आज हा खास पोस्टर जारी करण्यात आला आहे.
गोवा प्रदेश काॅंग्रेस समितीतर्फे "म्हादई जागोर" आंदोलनाला अधिक चालना देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या डिजीटल मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी जावडेकर यांना इशारा देणारा हा पोस्टर सोशल मीडियावर काँग्रेसने व्हायरल केला आहे.
म्हार्दोळकर म्हणतात की, काॅंग्रेस पक्ष म्हादई प्रश्नावर जन आंदोलनाचे समर्थपणे नेतृत्व करीत असून, सरकारने कलम १४४ मागे न घेतल्यास आम्हाला आंदोलन उग्र बनवावे लागेल. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हा लोकांचा अधिकार असून, सरकारने लोकांचा आवाज दाबू नये.