पणजी : राज्यातील कचऱ्याचे व्यवस्थापन करावे तसेच कळंगुट येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पही व्यवस्थितरीत्या हाताळावा या हेतूने मंत्रिमंडळाने कचरा व्यवस्थापन महामंडळाची शुक्रवारी स्थापना केली. क व ड वर्गीय कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी कर्मचारी निवड आयोगही स्थापन करण्यात आला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची शुक्रवारी पर्र्वरी येथे बैठक झाली. विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. तथापि, महत्त्वाची विधेयके याच अधिवेशनात मांडायची असल्याने व काही महत्त्वाचे निर्णय तातडीने घेणे गरजेचे असल्याने मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. मार्च २०१५ सालापर्यंतच्या वर्षाचा महालेखापालांचा अहवाल आला आहे. या अहवालास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. कर्मचारी भरतीवेळी वारंवार वेगवेगळ्या खात्यांनी परीक्षा घेऊ नयेत व एकदाच काहीशा घाऊक पद्धतीने क व ड वर्गीय पदांसाठी कर्मचाऱ्यांची निवड व्हावी, या हेतूने कर्मचारी निवड आयोग स्थापन केला जाईल, असे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी यापूर्वी जाहीर केले होते. या आयोगाच्या स्थापनेपूर्वीही विधेयक मंजूर होणे गरजेचे असल्याने मंत्रिमंडळाने विधेयकाचा मसुदा शुक्रवारी मंजूर केला. (खास प्रतिनिधी)
कचरा व्यवस्थापन महामंडळ स्थापन
By admin | Published: July 30, 2016 2:48 AM