पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागातील ७५० कामगार शुक्रवारी राज्यभर विविध स्वरूपात ‘पाणीबाणी’ आंदोलन करणार आहेत. यामुळे राज्यातील काही भागांत पाणीपुरवठ्यात व्यत्यय येण्याचे प्रकार घडू शकतात. कामगारांच्या दोन प्रमुख मागण्या सरकारने मान्य कराव्यात, यासाठी हे आंदोलन होत असल्याचे कामगार नेते अजितसिंग राणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. आपल्या मागण्यांसाठी हे कामगार गेली अनेक वर्षे लढत आहेत. मात्र, सरकारने निवडणुकांपुरता त्यांचा वापर करून घेतला. कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास सरकार तयार नसल्याने राजव्यापी पाणीबाणी आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे. या आंदोलनामुळे काही भागातील जनतेला पाणी मिळणे कठीण होणार आहे. मात्र, सरकारकडे आमचे प्रश्न पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन करावे लागत असल्याचे कामगारांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या या कामगारांना दरमहा नियमितपणे वेतन देण्यात येत नाही. केवळ चार हजार रुपयांचे मासिक वेतन तीन-चार महिन्यांनी दिले जाते. यामुळे कामगारांना घरसंसार चालविणे कठीण होते. सरकारने कामगारांना चार हजार वेतन देणे हा कायद्याने गुन्हा असून कामगारांचे किमान वेतन दहा हजार असावे, अशी मागणी कामगार नेते राणे यांनी केली आहे. कामगारांकडून कोणत्याही प्रकारची कामे करून घेतली जातात. तसेच कोणतीही सुरक्षेची साधने न पुरविता त्यांना मलनिस्सारण, गटार उपसणे आदी कामे करण्यास सांगितले जाते. याबाबत वरिष्ठांशी तक्रार केल्यास बदली केली जाते. अन्यथा अपमानास्पद वागणूक दिली जाते. (प्रतिनिधी)
आज राज्यभर ‘पाणीबाणी’ आंदोलन
By admin | Published: August 07, 2015 2:06 AM