पणजी - पावसाळ्याचा मोसम असला तरी, गोव्यात जलवाहिन्या फुटू लागल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. तिसवाडी आणि फोंडा या दोन तालुक्यांमधील नळ गेले तीन दिवस कोरडे आहेत. जलवाहिन्या दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. कदाचित रविवारी रात्रीर्पयत किंवा सोमवारी दुरुस्ती काम पूर्ण होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे.
फोंडा तालुक्यात जिथे भींत पडून दोन जलवाहिन्या फुटल्या तिथे भींत पडू शकते याची कल्पना लोकांना आली होती. जोरदार पाऊस होता व त्यामुळे भींत पडेल आणि जलवाहिन्या फुटतील हे कळत होते. पण, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना त्याची कल्पना आली नाही. जलवाहिन्यांखाली मातीच नव्हती. जलवाहिन्या वर होत्या, त्यांना खाली कोणता आधार नसल्याने त्या फुटतील हे कळून येत होते, अशी चर्चा सोशल मीडियावरही सुरू आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री दिपक पाऊसकर यांना लोकमतने विचारले असता, ते म्हणाले की सध्या जलवाहिन्यांच्या खाली सिमेंट काँक्रिटचे काम केले जात आहे. पाऊस नसल्याने हे काम जोरात सुरू आहे. पाऊस सुरू असता तर कामात व्यत्यय आला असता. पावसाने विश्रंती घेतल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण होईल. लोकांना त्रास होतोय याची सरकारला कल्पना आहे. बांधकाम खात्याकडील टँकरची संख्याही कमी पडत आहे. तथापि, आम्ही खासगी क्षेत्रतून टँकर मागविले आहेत. अनेक भागांत टँकर पाठवून पाणी समस्येवर मात करण्याचा प्रयत्न होत आहे.
दरम्यान, राजधानी पणजीसह सांताक्रुझ, सांतआंद्रे, ताळगाव, कुंभारजुवे, प्रियोळ, फोंडा अशा सात- आठ मतदारसंघातील हजारो कुटूंबे सध्या पाणी समस्येने त्रस्त झाली आहेत. अनेकांनी आपल्या कुटूंबांना गावी पाठवून दिले आहे. पाणी समस्येला कंटाळून राजधानी पणजीतील अनेक लोकांनी आपल्या फ्लॅटला कुलूप लावले आणि आपले मूळ गाव गाठले आहे. रविवारी किंवा सोमवारी तरी पाण्याची समस्या संपुष्टात यायला हवी, असे शहरातील लोकांना वाटते. अनेक भागांत टँकरही पोहचत नाही. दुकानदारांकडील पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याही संपल्या आहेत. काही जणांनी बाटल्यांचे दर वाढविले तर खासगी क्षेत्रातील टँकरांनीही प्रचंड शुल्क आकारणे सुरू केले आहे.