पणजी: राजधानी पणजीला देशातील टाॅप स्मार्ट सिटीपैकी एक बनविण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आणि इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलोपमेंट लिमीटेड यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. याचाच भाग म्हणून पणजीतील सर्वात जूनी सांडपाणी वाहिनी बदलण्याचे काम गेले सुमारे ३ वर्षे होते. यावर्षी मे पर्यंत ९० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावाही स्मार्ट सिटी प्रशासन करत आहे. परंतु अजूनही पणजीतील अनेक समस्या सुटलेल्या नाही.
स्मार्ट सिटीचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत असले, तरी नियमीत पाणी, सुरळीत रस्ता यासारख्या मूलभूत सुविधा अजून योग्य प्रकारे लोकांना मिळत नाही. सांडपाणी वाहनीचे काम जवळपास पूर्ण झाले तरी यासाठी करण्यात आलेले खोदकाम पूर्ण झालेले नाही. काही ठिकाणी केवळ मातीचा भर ओतून खोदकाम बुजविण्यात आले. तर अनेक ठिकाणी डांबरीकरण देखील झालेले नाही. आता तर या खोदकामांमुळे बहुतांश रस्ते खचले असून, परीणाम स्वरुप मोठे खड्डे तयार झाले आहेत.
पाण्याने भरलेले खड्डे ठरताहेत मृत्यूचे सापळे
पणजीत अनेक ठिकाणी लहान मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहेत. मळा, मिरामार, सांतिनेझ, १८ जून मार्ग, मार्केट परीसर, आल्तिनो या भागात मोठे खड्डे दिसून येत आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असते, त्यामुळे चालकांना याचा अंदाज येत नाही. दुचाकीस्वारांसाठी तर हे मृत्यूचे सापळेच बनत आहे. अशावेळी महानगरपालिकेने हे खड्डे बुजविण्यावर भर दिला पाहीजे, पण असे होताना दिसत नाही.