लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : अंजुणे धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने सरकारी यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. सत्तरी व डिचोली तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पडोशे जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी आता तिळारी धरणाचे पाणी आणण्याचे प्रयत्न चालले आहेत.
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, साखळी कॉलेजजवळ कालव्यातून तिळारीचे पाणी आणले जाईल व तेथून बांधकाम खात्याच्या जुन्या जलवाहिनीतून पडोशे प्रकल्पापर्यंत आणले जाईल. ही जलवाहिनी गेली बरीच वर्षे विनावापर आहे. पुढील दोन दिवसांत या जलवाहिनीची चाचणी घेऊन साधारणपणे शुक्रवारपासून तिळारीचे पाणी पडोशे प्रकल्पात आणले जाईल. अंजुणे धरणाचे पाणी सत्तरी, डिचोली तसेच बार्देश तालुक्यांच्या काही भागांमध्येही वापरले जाते. शिरोडकर म्हणाले की, तिळारी धरण ९६ टक्के भरलेले आहे. तिथे मुबलक पाणीसाठा असून पाऊस लांबणीवर पडला तरी सत्तरीला पाणीपुरवठा करणाऱ्या 'पडोशे' प्रकल्पाला तसेच बार्देश, डिचोलीला पाणी कमी पडणार नाही.
साखळी कॉलेजजवळ कालव्यातून तिळारीचे पाणी आणले जाईल व तेथून बांधकाम खात्याच्या जुन्या जलवाहिनीतून पडोशे प्रकल्पापर्यंत आणले जाईल. या जलवाहिनीची चाचणी घेऊन शुक्रवारपासून तिळाचे पाणी पडोशे प्रकल्पात आणले जाईल. - सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री