लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: एकीकडे मान्सून लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत असतानाच दुसरीकडे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची घट होत असल्याने पिण्याच्या पाण्याचे कसे होईल, अशी चिंता व्यक्त होऊ लागली आहे. संपूर्ण दक्षिण गोवा ज्याच्यावर अवलंबून आहे, त्या साळावली धरणात केवळ २५ टक्के पाणी शिल्लक आहे. पंचवाडी धरणात ७ टक्के तर अंजुणे धरणात ११ टक्के पाणी राहिले आहे.
मान्सून लांबल्यास पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जलस्रोत खात्याचे अधिकारी दैनंदिन तत्त्वावर पाण्याची पातळी तपासत आहेत. त्यानुसार आमठाणे धरणात सध्या ५५ टक्के पाणी आहे. चापोली धरणात ४६ टक्के तर गावणे धरणात ४१ टक्के पाणीसाठा आहे. महाराष्ट्र-गोवा सरकारचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणात मात्र ९६ टक्के पाणीसाठा आहे; परंतु तिळारीच्या बाबतीत सर्व काही बेभरवशाचे आहे.
बार्देश तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला तिलारीचे पाणी न मिळाल्यास आमठाणेहून घेतले जाते, तसेच साळ येथून शापोरा नदीतून पंपिंग करून पाणी घेतले जाते. चांदेल प्रकल्पाला पाणी न मिळाल्यास कळणे नदीतून पंपिंग करून घेतले जाते, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. धरणांमधील पाणी कमी दिसत असले तरी कच्चे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला.
पावसाची हुलकावणी
१ यंदा मान्सूनचे आगमन ४ दिवस उशिरा होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. परंतु हा उशीर केवळ ४ दिवस असणार की त्यापेक्षा अधिक असणार या बाबतीतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या या अंदाजानुसार आतापर्यंत मान्सून अंदमान निकोबार बेटांवर धडक द्यायला हवी होती, परंतु अद्याप त्या ठिकाणी मान्सून पोहोचलेला नाही.