लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: उत्तर गोव्यात बहुतेक ठिकाणांसह खास करून आणि तालुक्याला पेडणे बार्देश मोठ्या प्रमाणात ज्या धरणातून पाणीपुरवठा केला जातो त्या तिळारी धरणाच्या दुरुस्ती कामासाठी उद्यापासून ६६ दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे.
धरणाच्या दुरुस्ती कामासाठी १० ऑक्टोबर ते १५ डिसेंबर असे दोन महिन्यांहून अधिक दिवस लागणार असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे. या काळात या धरणातून पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे ओपा, अंजुणे आणि खांडेपार पाणी प्रकल्पावर लोकांना अधिक अवलंबून राहावे लागणार आहे. याविषयी माहिती देताना मंत्री शिरोडकर यांनी म्हटले आहे की, दुरुस्तीकामांसाठी धरणाचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्यामुळे गोव्यात काही प्रमाणात पाणी समस्या होण्याची शक्यता आहे. परंतु लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
गोवा सरकारकडून विशेष खबरदारी घेऊन पाणी व्यवस्थापन केले जाईल, असे शिरोडकर यांनी सांगितले. यामुळे उत्तर गोव्यातील पेडणे, बार्देश, लाटंबार्से, दोडामार्ग परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना फटका बसणार आहे. या काळात उत्तर गोव्याला अस्नोडा तसेच वाळवंटी नदीतून पाणी देण्यात येईल. पर्वरी भागात पाणीपुरवठा कसा करायचा यावरही लवकरच तोडगा काढला जाईल. यंदा पाऊस खूप पडल्यामुळे फारसी समस्या उद्भवणार नाही, असेही मंत्री म्हणाले.
दुरुस्ती आवश्यक
तिळारी धरणास ३० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यामुळे धरणाची डागडुजी आवश्यक आहे. हे काम १० डिसेंबरपर्यंत संपविण्याची विनंती महाराष्ट्र सरकारला केल्याचेही जलस्रोतमंत्र्यांनी सांगितले.