पेडणे : पेडणे तालुक्याच्या विकासाचा इतिहास पाहिल्यास आजची तारीखसुद्धा महत्त्वाची आहे. पुढील ५० वर्षांचा विचार तालुक्याच्या करून पेडणे जनतेसाठी उद्योग, व्यवसायासाठी आणि शेतीसाठी पाण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे आजची तारीख महत्त्वाची आहे. त्याच पद्धतीने मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, आयुष इस्पितळ या दोन्ही प्रकल्पांचे ज्यावेळी भूमिपूजन आणि उद्घाटन झाले त्यातारखा सुद्धा इतिहासात चमकतील. त्या तारखा जनतेने लक्षात ठेवाव्यात, असे आवाहन जलसिंचन मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.
कासारवर्णे बैलपार येथील नदीवर ११२ एमएलडी पंप हाऊस उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते. कासारवर्णे पंचायत क्षेत्रातील बैलपार येथे जलसिंचन खात्यांतर्गत सुमारे २२ कोटी रुपये खर्च करून नवीन पंप हाऊस प्रकल्प उभारला आहे. त्या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, जलसिंचन खात्याचे मुख्य अभियंते प्रमोद बदामी कासारवर्णे सरपंच नवनाथ नाईक, चांदल हसापूरचे सरपंच तुळशीदास गावस, वारखंडचे उपसरपंच वसंत नाईक उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार अनंत मळीक, पंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. रामदास डावरे यांनी स्वागत सूत्रसंचालन केले.
आहे जलनियोजन?
एकूण ११२ एमएलडी कच्चे पाणी येथील पंपहाऊसमधून खेचले जाईल. त्यातील ३० एमएलडी पाणी चांदेल पाणी प्रकल्पासाठी, ५ एमएलडी मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी, ३० एमएलडी तुये येथील नियोजित जलप्रकल्पासाठी, ४७ एमएलडी पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरवले जाईल, अशी माहिती मंत्री शिरोडकर यांनी दिली.
उभारणार संरक्षक भिंत : आर्लेकर आमदार आर्लेकर म्हणाले, बैलपार किनारी भागात दोन्ही बाजूने ९०० मीटर लांबीची संरक्षण भिंत उभारण्यात येईल.
पेडण्यातील पत्रकार जागरूक...
- मंत्री शिरोडकर म्हणाले, पेडणे तालुक्यातील पत्रकार जागरूक आहेत. आपण ज्यावेळी या प्रकल्पाच्या कामाची पाहणीसाठी आलो होतो, तेव्हा पत्रकारांनी माझ्यावर प्रश्नांचा भडिमार केला होता.
- आपण त्यावेळी शांत राहिलो. आज त्याचे फळ पेडणेवासीयांना मिळत आहे. मोठ्या संख्येने पत्रकारही आज उपस्थित आहेत. त्यामुळे जनतेच्या हितासाठी कार्य करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
औद्योगिक वसाहतीमध्ये एकही भूखंड विनावापर ठेवू नका
मंत्री शिरोडकर म्हणाले, पेडणे तालुका सर्व दृष्टीने विकसित करण्याची जबाबदारी ज्या पद्धतीने दोन्ही लोकप्रतिनिधींची पंचायत मंडळ जिल्हा पंचायत सदस्यांवर आहे. त्याचप्रमाणे नागरिकांची आहे. भविष्यात तुये औद्योगिक वसाहतीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स सिटीमध्ये जे प्लॉट तयार केलेले आहे. त्यातील एकही भूखंड विनावापर न ठेवता नवनवीन कारखाने त्यामध्ये यावेत आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.