पणजी: उत्तर गोव्यात बहुतेक ठिकाणी आणि बहुतेक करून पेडणे आणि बार्देश तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ज्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्या तिलारी धरणाच्या दुरुस्ती कामासाठी ६६ दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे गोव्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी म्हटले आहे.
धरणाच्या दुरुस्ती कामासाठी १० ऑक्टोबर ते १५ डिसेंबर असे दोन महिन्याहून अधिक दिवस या धरणाच्या दुरुस्तीसाठी लागणार असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने गोव्याला कळविले आहे. या काळात या धरणातून पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे ओपा, अंजुणे आणि खांडेपार पाणी प्रकल्पावर लोकांना अधिक अवलंबून रहावे लागणार आहे.
या विषयी माहिती देताना मंत्री शिरोडकर यांनी म्हटले आहे की दुरुस्तीकामांसाठी धरण पाणी पुरवठ्यासाठी बंद ठेवावे लागणार असल्यामुळे गोव्यात काही प्रमाणात पाणी समस्या होण्याची शक्यता आहे. परंतु लोकानी घाबरून जाण्याचे कारण नाही. गोवा सरकारकडून विशेष खबरदारी घेऊन पाणी व्यवस्थापन केले जाईल असे शिरोडकर यांनी सांगितले.