लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: मान्सून मंदावला आहे. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. सध्या ५० ते ६० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा धरणांत आहे. ६ जुलैपर्यंत मान्सून कमकुवत राहिला तरी परिणाम होणार नाही, असे सांगत जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी गरज पडल्यास खाणींच्या खंदकांमधील पाणी वापरणार असल्याचे सांगितले.
मंत्री शिरोडकर म्हणाले की, साळावली, अंजुणे धरणांमध्ये पुरेसे पाणी आहे. आमठाणे धरणात ३० ते ४० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. तिळारी धरणातही भरपूर प्रमाणात पाणी आहे. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात ते वापरू. ओपा प्रकल्पातील जलाशयातही पुरेसे पाणी आहे.
धरणांमधील पाण्याच्या स्थितीचा आढावा घेतला असता असे आढळले की, संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणी पुरवठा करणाया साळावली धरणात केवळ २१ टक्के पाणीसाठा आहे. पंचवाडी धरण कोरडे पडले आहे. अंजुणे धरणात फक्त ४ टक्के पाणी राहिले आहे. चापोली धरणात ४२ टक्के, आमठाणे धरणात ४४ टक्के तर गावणे धरणात ३६ टक्के पाणी राहिले. गोवा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणात मात्र ९६ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, तिळारीचे कालवे अधूनमधून फुटण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे तिळारीचे पाणी बेभरवशाचे आहे.
६ जुलैपर्यंत मान्सून अत्यंत कमजोर राहणार, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केल्याने तसे झाल्यास राज्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे सरकारचा असा दावा आहे की, धरणांमध्ये पुढील ५० ते ६० दिवस पुरेल एवढे पाणी आहे.