म्हापसा : उत्तर गोव्यातील अस्नोडा येथे असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पात झालेल्या बिघाडामुळे बार्देस तालुक्यातील लोकांना ऐन चतुर्थी काळात पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. संतप्त म्हापसावायिसांनी सुरुवातीला साहाय्यक अभियंत्याला घेराव घातला. नंतर म्हापशातील वाहतूक रोखून धरली. आंदोलनानंतर पुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने वाहतूक पुन्हा मार्गी लागली.
ऐन चतुर्थीच्या काळात मागील सात दिवसापासून पूर्ण बार्देस तालुक्यात तसेच डिचोली तालुक्यातील काही भागातील पुरवठ्यावर परिणाम झाला होता. अस्नोड्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाणी खेचणारे पंप नादुरुस्त झाल्याने हा परिणाम झाला होता. परिणामी काही लोकांनी चतुर्थी नियंत्रित पाणी पुरवठ्याने काही लोकांना गढूळ पाणी पुरवठ्याने तर काहींना टँकरद्वारे होत असलेल्या पाणी पुरवठ्यातून साजरी करावी लागली.
सणासाठी पाणी नसल्याने संतप्त झालेल्या म्हापशातील लोकांनी बार्देस तालुक्याच्या विभागाचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या साहाय्यक अभियंता सुभाष बेळगावकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घातला व पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. या दरम्यान त्यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचे पाहून त्यांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या म्हापसा बस स्थानकासमोरी रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक अडवली. त्यात महिलांचा समावेश होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलीस कुमक सुद्धा मागवण्यात आली.
निरीक्षक तुषार लोटलीकर आपल्या फौजफाट्यासहित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. नंतर बेळगावकर यांच्या कार्यालयात जावून त्यांच्याशी चर्चा केली. केलेल्या चर्चे अंती बेळगावकर यांनी नंतर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत फोनवरुन चर्चा करुन आज संध्याकाळपर्यंत म्हापसावासियांना पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन त्यांना दिले. संध्याकाळपर्यंत काही भागात पुरवठा पूर्ववत करण्याचे तसेच उद्या राहिलेल्या इतर भागातील पुरवठा सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ज्या भागात पुरवठा होणार नाही त्या भागातील लोकांनी नागरिकांना टँकरद्वारे पुरवठा करण्याचे आश्वासन त्यांना दिले. दिलेल्या आश्वासनानंतर जमलेल्या नागरिकांनी उद्यापर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला असून पुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा त्यांच्या कार्यालयाला धडक देण्याचा इशारा दिला.
दरम्यान बिघाड झालेले पंप बदलण्याचे काम सुरु करण्यात आल्याची माहिती बेळगावकर यांनी दिली. हे काम अंतिम टप्प्यात असून उद्यापर्यंत ८५ टक्के भागातील पुरवठा सुरळीत केला जाणार असून शुक्रवारपर्यंत तालुक्यातील पुरवठा सुरळीत होणार असल्याचे ते पुढे म्हणाले.