लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: आईप्रमाणेच झाडांची काळजी घ्या. वायनाड प्रकरण आमचे डोळे उघडणारे असून ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम जाणवत आहेत. निसर्ग संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे विपरीत परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
'एक पेड माँ के नाम' अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी साखळी येथील सरकारी शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले. यावेळी भारतीय जनता पार्टी को-ऑपरेटिव्ह सेलचे अनिल काणेकर, नगरसेवक, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येक विद्यार्थी, पालकांनी वृक्ष संवर्धन, निसर्गरक्षण, पर्यावरण जागृती यांबाबत विशेष योगदान द्यावे. आज जागतिक पातळीवर निसर्गावर घाला होत असताना निसर्ग जगला तरच सृष्टी सुस्थितीत राहील याचे भान ठेवून सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी मुलांनी झाडे लावली आणि शपथही घेतली.