पणजी : लमाण्यांबाबत आम्हाला आदर आहे. लमाणी ही जमात आहे. लमाण्यांवर नव्हे तर किनाऱ्यांवरील फिरत्या विक्रेत्यांवर बंदी घालायला हवी. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांना विधान करताना लमाणी ही जमात असल्याचे लक्षात आले नाही. भाजपप्रणीत आघाडी सरकारच्या वतीने आम्ही माफी मागतो, असे भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी मंगळवारी येथे सांगितले.भाजपच्या कार्यालयात लोबो यांनी दत्तप्रसाद नाईक व हेमंत गोलतकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. लोबो म्हणाले, की लमाण्यांना दुखविण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. लमाणी समाजातील नेते आपल्याला भेटायला आले होते. आपण नंतर मंत्री आजगावकर यांच्याशीही बोलणी केली. किनाऱ्यांवरील फिरत्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई व्हायला हवी, असे आजगावकर यांना म्हणायचे होते. त्यांनी चुकून लमाणी म्हटले. भाजपच्या वतीने व सरकारच्या वतीने आम्ही माफी मागतो. फिरत्या विक्रेत्यांना बंदी लागू करायला हवी, आम्ही कळंगुटमध्ये तशी ती केली आहे.किनारपट्टीत रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात संगीत सुरू राहू नये याविषयी गोवा फॉरवर्डचे मंत्री विनोद पालयेकर यांनी घेतलेल्या भूमिकेविषयी पत्रकारांनी विचारले असता, लोबो म्हणाले की संगीत हे गोव्याच्या संस्कृतीचा भाग आहे. संगीतावर बंदी लागू करता येणार नाही. फक्त कायद्याचे उल्लंघन करून खूप मोठ्या प्रमाणात संगीत वाजविले जात असेल तर त्यावर नियंत्रण आणायला हवे. मंत्री पालयेकर यांच्या शिवोली मतदारसंघात काही ठिकाणी तसे होत असावे. त्यामुळे तिथे त्यांनी कारवाई करावी. योग्य अशा आवाजात जर संगीत वाजविले जात असेल तर ते रात्री बारा वाजेपर्यंत वाजविण्यास हरकत नसावी. मी तर एक पाऊल पुढे टाकून म्हणेन की, गोव्यात रात्री बारा वाजेपर्यंत संगीत वाजविण्यासाठीच विशेष असे झोन तयार केले जायला हवेत. लोबो म्हणाले, की कळंगुट मतदारसंघात ड्रग्स व्यवसाय आता पूर्णपणे बंद झाला आहे. वेश्या व्यवसायाविरुद्धही कारवाई होत आहे; पण विविध पद्धतीने तो चालू राहतो ही खरी गोष्ट आहे. काही लोक फ्लॅट्स, घरे वगैरे भाडेपट्टीवर देतात. तिथे गैरधंदे चालतात.कॅसिनोंविषयी बोलताना लोबो म्हणाले, की कॅसिनो हे आता गोव्याच्या पर्यटनाचा भाग झालेले आहेत. मांडवी नदीतून त्यांची अन्यत्र व्यवस्था करण्याबाबत सरकार तोडगा काढील. सरकारमध्ये नवे दोन मंत्री आता येत असले तरी, ते पूर्वीच्या चुका करणार नाहीत याची काळजी मुख्यमंत्री घेतील. (खास प्रतिनिधी)
लमाण्यांबाबत आदर, आम्ही माफी मागतो
By admin | Published: April 12, 2017 2:32 AM