पणजी: सेंट फ्रांसिस झेवियरच्या शव प्रदर्शनाला राज्यात यंदा पोप दाखल होणार आहेत. ही सर्व गोमंतकीय जनेतेसाठी आणि खासकरुन ख्रिस्ती बांधवांसाठी आनंदाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा निर्णय घेऊन दाखवून दिले आहे कि त्यांच्या राज्यात हिंदू, ख्रिस्ती, व मुस्लीम बांधव सर्व समान आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, तसेच या दरम्यान आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना असणार आहे, अशी माहिती सांताक्रूझचे आमदार रुदोल्फ फर्नांडिस यांनी पत्रकार परीषदेत शनिवारी दिली.
पोप १९८६ मध्ये शेवटचे गोव्यात आले होते, या गोष्टीला आता सुमारे ३८ वर्षे झाली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्याच्या प्रयत्नाने पुन्हा पोप राज्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्याशी खास चर्चा देखील करण्यात आली असून, पोपच्या स्वागतासाठी खास कमीटी देखील स्थापन करण्यात येणार आहे. आधीच फ्रांसिस झेवियर यांच्या शवप्रदर्शनाला लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित असतात, पण आता पोप येणार म्हटल्यावर जगभरातील लोक जुने गोवा येथे जमणार आहे, त्यामुळे याची वेगळी तयारी करणे आवश्यक आहे. आतापासूनच आम्ही तयारीला लागणार आहोत, असे फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा इटली भेटीवर होते, तेव्हा त्यांनी पोप यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते. मोदी जेव्हा राज्यात आले होते तेव्हा त्यांनी सेंट फ्रांसिस झेवियर यांना गोयंचो साहेब असा उल्लेख करत विरोधकांची तोंडे बंद केली होती. आता जेव्हा पोप गोव्यात येत आहे, यातून सेंट फ्रांसिस झेवियर यांच्या शवप्रदर्शनाला जागतिक स्वरुप तयार होणार आहे. या अनुषंगाने राज्यातील विकास कामे, खासकरुन चिंबल येथील रस्ते, फ्लायओवरचे काम लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे, असेही फर्नांडीस यांनी यावेळी सांगितले.