पणजी : उत्पल पर्रिकर यांच्याविषयी आम्हाला चिंता आहे. मी गेले महिनाभर उत्पलच्या संपर्कात आहे. आम्ही अजून त्याच्याशी चर्चा करू, असे भाजपचे नेते व गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांनी काल लोकमतच्या पणजी कार्यालयाला भेट दिली. राज्याचे राजकारण, भाजपचे तिकीट वाटप व अन्य अनेक विषयांवर फडणवीस यांनी मनसोक्त संवाद साधला.
उत्पलविषयी विचारताच फडणवीस म्हणाले, की स्व. पर्रिकर यांचे कुटुंब हे शेवटी आमचे आहे. आम्हाला उत्पलविषयी चिंता असल्याने त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत आम्ही विचार केला आहे. उत्पल यांना सध्या अशा माणसांनी घेरलंय ज्या माणसांना त्यांच्या राजकीय भवितव्याची पर्वा नाही, त्या माणसांना त्यांचा स्वत:चा स्वार्थ साधायचा आहे. उत्पल यांना भाजप योग्य ते स्थान देईल, त्यांना उज्ज्वल भवितव्य असेल. उत्पलनादेखील भविष्यात संधी दिली जाईल. मी अजूनही बोलेन त्यांच्याशी, असे फडणवीस म्हणाले.‘मनोहर पर्रिकर हे आमचे फार मोठे नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी कायम आदर राखला जाईल. उत्पल यांनी पक्षाचे काम करावे, असे फडणवीस म्हणाले.
उत्पल यांच्याभोवती वावरणारे कार्यकर्ते त्यांना चुकीचा सल्ला देत आहेत. त्यांच्या राजकीय भवितव्याशी ते खेळत आहेत. त्यांच्या भवितव्याशी त्यांना काही देणे घेणे नाही, असा दावाही फडणवीस यांनी केला.
एखादाच आमदार गळेल विद्यमान आमदारांपैकी जवळजवळ सर्वांनाच तिकिटे मिळतील. एखादाच गळेल. एखाद-दुसऱ्याला मिळणार नाही एवढेच पण भाजप स्वबळावर गोव्यात सरकार स्थापन करू शकेल असे मी पूर्ण विश्वासाने सांगतो, असे फडणवीस यांनी नमूद केले. भाजपचे केडर काही ठिकाणी दुखावलेले असले तरी, सर्वजण पक्षासोबत आहेत. बंडखोरीची मोठी समस्या आता नाही. फक्त एक-दोन मतदारसंघांपुरतीच ती आहे, असे फडणवीस म्हणाले.