पणजीः गोव्यातील लोक पोर्तुगीज नागरिकत्व स्विकारून विदेशातच स्थायिक होत असले तरी त्याविषयी सरकार काहीच करू शकत नाही असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले. स्वतःहून भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना कोण काय करणार असेही ते म्हणाले.
भारतीय नागरिकत्व सोडून पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांची संख्या दर वर्षी वाढत असल्यामुळे या विषयी पूर्वीही चिंता व्यक्त केली जात होती आणि आताही केली जात आहे. परंतु हे प्रकार कुणीच रोखू शणार नाहीत. कारण विदेशी नागरिकत्वासाठी भारतीय नागरिकत्व सोडणे हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. मग ते कोणत्याही कारणासाठी असो, नोकरी धंद्यासाठी असो किंवा इतर कारणांसाठी. त्यांनी नागरिकत्व स्वःहून सोडलेले असते. त्यामुळे या बाबतीत सरकार काहीही करू शकतनाही असे त्यांनी सांगितले. विरोधी आमदारांनी संयुक्तरित्या हा प्रश्न विचारला होता. त्यात वेन्झी विएगश, विरेश बोरकर आणि एल्टन डिकॉस्टा यांचा समावेश होता. विदेशी भारतीयांच्या समस्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. त्या संबंधी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की विदेशी भारतीयांच्या समस्यांसंबंधी मात्र गोवा सरकार काही तरी मार्ग काढू शकतो. आमदार वेन्झी विएगश यांनी गोव्यात रोजगार संधी उपलब्ध नसल्यामुळे लोक विदेशात जात असल्याचे सांगितले. त्यासाठी नाईलाजाने भारतीय नागरिकत्व त्यांना सोडावे लागते असेही ते म्हणाले. विरेश बोरकर यांनीही त्यांच्या सूरात सूर मिळविताना म्हणाले की त्यांना भारतीय नागरिकत्व सोडावे लागू नये. मात्र कायद्यात त्या शिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांना विदेशी नागरिकत्व मिळाल्यानंतर भारतीय नागरिकत्व सोडून द्यावेच लागते ही वस्तुस्थिती आहे.