पणजी : सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार माजला व प्रशासन कमकुवत झाले हे आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांचे आरोप आम्हाला मान्य नाहीत. मी आर्चबिशपांना स्वतंत्रपणे भेटणार आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले. भाजप कसा आहे व आमचे सरकार कसे आहे, हे आमच्यासोबत काम केलेले सहा ख्रिस्ती आमदारच सांगू शकतील. आम्हाला कुणाच्या फुटपट्टीची गरज नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आर्चबिशपांना प्रतिटोला हाणला. बुधवार, २८ रोजी नाताळनिमित्त आर्चबिशपांनी आल्तिनो येथे बिशप पॅलेससमोर वार्षिक स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व मुख्यमंत्री पार्सेकर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच आर्चबिशपांनी भाषण करताना प्रशासनाबाबत तिखट भाष्य केले. खाण क्षेत्रातील व्यवहार, प्रशासनाचा कमकुवतपणा व भ्रष्टाचार याविषयी आर्चबिशप बोलले होते. त्यानंतर चहापानास मुख्यमंत्री व पर्रीकर थांबले नाहीत. बिशपांचे भाषण संपले, तरी सोहळा सुरू असताना ते उठून गेले होते. शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना याविषयी विचारले असता, पार्सेकर म्हणाले की, मला ते आरोप मान्य नाहीत. त्या दिवशी आर्चबिशपांच्या भाषणानंतर मी बाहेर जात असताना एक ख्रिस्ती धर्मगुरू मला बाहेर पोहोचविण्यासाठी आले होते, त्या वेळीच मी आर्चबिशपांना स्वतंत्रपणे एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. मी त्यांना भेटेन. नेमके कधी भेटेन ते आताच सांगत नाही. मुख्यमंत्री म्हणाले की, गेली पाच वर्षे सहा ख्रिस्ती आमदार आमच्यासोबत आहेत. काही ख्रिस्ती आमदार मंत्रिमंडळात आहेत. आमचे सरकार व भाजप यांच्यासाठी तेच खरे न्यायाधीश आहेत. बाहेरील व्यक्ती आम्ही कसे आहोत याविषयी काही सांगू शकणार नाही, आमच्यासोबत असलेले ख्रिस्ती आमदारच ते सांगू शकतील. पार्सेकर म्हणाले, आम्ही समाजाच्या कुठच्याच एखाद्या घटकाचे लांगूलचालन करून निवडणूक जिंकू पाहत नाही. तर आम्ही पाच वर्षांत केलेल्या भरीव विकासकामांच्या आधारे लढत आहोत. (खास प्रतिनिधी)
तुमच्या फुटपट्टीची आम्हाला गरज नाही!
By admin | Published: December 31, 2016 3:15 AM