पणजी : व्हायब्रंट गोवा परिषदेमुळे गोव्यात यापुढील काळात आर्थिक वाढीला वेग येईल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी येथे शनिवारी व्यक्त केला. गोव्याला राष्ट्रीय निर्यात हबमध्ये रुपांतरित करण्यासाठी केंद्र सरकार सर्व ते पाठबळ देईल, आपण स्वत: त्यासाठी केंद्रीय स्तरावरून सर्व प्रयत्न करू, असेही गोयल यांनी सांगितले.तीन दिवसीय परिषदेचा शनिवारी समारोप झाला. आंतरराष्ट्रीय परिषदेद्वारे गोव्यात देश- विदेशातील गुंतवणूक येण्याचा मार्ग खुला व्हावा हे स्व. मनोहर र्पीकर यांचे स्वप्न होते. त्यानुसारच गोव्याची पाऊले पडत आहेत हे पाहून आनंद वाटतो,असे गोयल आपल्या समारोपाच्या भाषणात म्हणाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्वार्थाने या परिषदेला पाठींबा दिला म्हणून मुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत, असेही गोयल म्हणाले.गोव्यात आर्थिक वाढीला वेग यावा म्हणून गोवा व केंद्र सरकार डबल इंजिनप्रमाणो काम करत आहे. आर्थिकदृष्टय़ा गोवा प्रबळ व्हायला हवा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही वाटते. व्हायब्रंट गोवाचे आयोजन हे त्या दिशेने पडलेले महत्त्वाचे व मोठे पाऊल आहे. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत गोव्याचे दरडोई उत्पन्न तीनपट जास्त आहे. अन्य जी राज्ये गुंतवणूक आकर्षित करतात, त्या राज्यांशी स्पर्धा करण्यासारखे गोव्याचे घरेलू उत्पादन प्रमाण (14 टक्के) आहे. नव्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी गोव्याने एक खिडकी योजना अस्तित्वात आणली हे स्वागतार्ह आहे.एनजीओंवर तोंडसुख गोयल यांनी राज्यातील एनजीओंवर टीका केली. कोणत्याही प्रकल्पाचे काम गोव्यात सुरू करायचा झाले की,येथील एनजीओंकडून अडथळे निर्माण करण्यासाठी कारणो शोधली जातात. गोमंतकीयांनी अशा एनजीओंविरुद्ध उभे ठाकण्याची गरज आहे, असे गोयल म्हणाले. मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम न्यायालयीन खटल्यांमुळे अडून उरले हे दुर्दैवी आहे. गोव्यात विमानतळासारख्या प्रकल्पांमुळे मोठय़ा संख्येने रोजगार संधी निर्माण होतील व गोव्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होईल याचा विचार एनजीओंनी करावा असे गोयल म्हणाले.
गोव्याला राष्ट्रीय निर्यात हबमध्ये रुपांतरित करू, पीयूष गोयल यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 8:32 PM