लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव: आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागांवर आम्ही जिंकू व ते ही मताधिक्यांनी, असे केंद्रीय माहिती राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले. मडगावच्या दक्षिण गोवाभाजपा कार्यालयात चंद्रशेखर यांनी फातोर्डा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संयुक्त मोर्चा संमेलनात मार्गदर्शन केले. व्यासपीठावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाबू कवळेकर, सरचिटणीस दामू नाईक, नरेंद्र सावईकर, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हैदर शहा, सर्वानंद भगत, आमदार उल्हास तुयेकर, फातोर्ड भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढील होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ३५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागच्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने सर्व स्तरावर प्रगती केलेली आहे. त्यापूर्वी या देशात घराणेशाही होती. लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपाविरोधात प्रचार करताना देशाचा अपमान करण्याचे प्रयत्न करतील. देशाची प्रगती रोखण्याचे प्रयत्न करतील, त्यांना असफल करून विरोधकांचे मनसुबे उधळून लावूया असेही चंद्रशेखर म्हणाले.
दामू नाईक यांनी प्रास्ताविक केले. आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत देशाची प्रगती साधली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती, त्याची पूर्तता केली असे सांगितले. मनोहर बोरकर यांनी स्वागत केले तर दिलीप नाईक यांनी सूत्रसंचालन केले.