पणजी : प्रा. सुभाष वेलिंगकर हे जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा संघचालक होते तेव्हा आम्ही गोव्यात भाजपच्या वाढीसाठी वेलिंगकर यांचे मार्गदर्शन घेत होतो आणि त्यांच्याशी चर्चाही करत होतो. याचा अर्थ गोव्यात भाजप सत्तेपर्यंत पोहचला तो एकट्या वेलिंगकर यांच्यामुळे असे होत नाही, असे भाजपचे नेते व माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
येथे पत्रकार परिषदेत बोलताना आर्लेकर म्हणाले, की गोव्यात वेलिंगकर यांच्यामुळे भाजपची वाढ झाली व त्यांच्यामुळेच हा पक्ष सत्तेपर्यंत पोहचला, अशी विधाने काल-परवा काहीजणांनी केली. त्यामुळे वस्तूस्थिती मांडणे या हेतूने मी बोलत आहे. वेलिंगकर किंवा अन्य कुणा एका व्यक्तीमुळे भाजपची वाढ झालेली नाही. वेलिंगकर यांचे योगदान आहेच. ते आम्ही नाकारत नाही. पण भाजपला मोठे करण्यासाठी आम्ही अनेकांनी त्यासाठी घाम गाळला. अनेकांनी व्यक्तीगत महत्त्वाकांक्षा दूर ठेवल्या व पक्षाचे काम केले. त्यामुळेच भाजप सत्तेत पोहचला.
आर्लेकर म्हणाले, की वेलिंगकर संघचालक होते तेव्हा आपण, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर हे संघाचे काम करत होतो. तथापि, संघाने आम्हा तिघांना प्रथम भाजपचे काम सुरू करण्यास सांगितले. मग मनोहर पर्रिकर, सतिश धोंड वगैरे भाजपचे काम करू लागले. मग विनय तेंडुलकर, गोविंद पर्वतकर असे अनेकजण भाजपच्या कामासाठी आले. या सर्वानीच सामुहिकपणे कष्ट घेतले. घाम गाळला. या काळात आम्ही वेलिंगकर यांच्याशी चर्चा करत असे. त्यांची विचारपूस करत असे. तेही आमची विचारपूस करत असत. याचा अर्थ वेलिंगकर यांनीच गोव्यात भाजप वाढवला असे होत नाही एवढेच मला सांगायचे आहे. काहीजणांना गोव्यातील संघाचा आणि गोव्यातील भाजपचा इतिहास ठाऊक नाही व त्यामुळे ते काहीही विधाने करतात., असा आरोपही त्यांनी केला.