पणजी : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फॅशन डिझायनर पद्मश्री वेंडेल रॉड्रिक्स यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. बार्देश तालुक्यातील कोलवाळ गावात असलेल्या निवासस्थानीच सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.रॉड्रिक्स यांची देश- विदेशात ख्याती होती. पर्यावरण रक्षण चळवळीतील कार्यकर्ते म्हणूनही ते ओळखले जात होते. महामार्ग रुंदीकरणाच्या कामावेळी कोलवाळ येथील झाडे कापली जाऊ नये म्हणून त्यांनी चळवळ सुरू केली होती. समलिंगी संबंधांच्या समर्थनाच्याबाजूनेही ते कायम आवाज उठवत राहिले. त्यांना विविध पैलू असले तरी, फॅशन डिझाईनर म्हणूनच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही नाव कमाविले. अनेक राष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तींसाठी त्यांनी कपडे डिझाईन केले.त्यांचा जन्म 28 मे 196० रोजी झाला होता. 2014 साली त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले होते. त्यांच्या नावावर काही पुस्तकेही आहेत. आरोग्य मंत्री विश्वजित राणे तसेच थिवी मतदारसंघाचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी वेंडेल यांच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले. वेंडेल यांचे आमच्या कुटुंबाशी अनेक वर्षाचे मित्रत्वाचे नाते होते. त्यांच्या निधनाचे वृत्त मला समजले, तेव्हा खूप वाईट वाटले, असे मंत्री राणे म्हणाले.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिक्स यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 8:51 PM