वास्को - आपल्या दोन मित्राबरोबर दक्षिण गोव्यात असलेल्या कुवेली, कासावली येथील चिरे खाणीत भरलेल्या पावसाच्या पाण्यात आंघोळीसाठी गेलेला १६ वर्षीय अनिल शंकर चव्हाण या विद्यार्थ्यांचे मंगळवारी (दि.११) बुडून निधन झाले. झुआरीनगर येथील एमईएस उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या वाणिज्य शाखेत अकरावीच्या वर्गात शिकणारा अनिल त्याच्याच वर्गातील मित्रासहीत चिरे खाणीत आंघोळीसाठी गेला असता तो तेथे बुडून मरण पावला.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. शांतीनगर, वास्को येथे राहणारा अनिल चव्हाण विद्यालयात गेल्यानंतर तेथून तो त्याच्या वर्गातील दोन मित्रासहीत कुवेली, कासावली येथील एका चिरे खाणीत आंघोळीसाठी गेला. पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार सुमारे २० वर्षापासून ती चिरेखाण विनावापर असून त्यात मोठ्या प्रमाणात पाणी भरलेले आहे. अनिल आणि त्याचे मित्र चिरे खाणीकडे पोचल्यानंतर अनिल चिरे खाणीत पावसाच्या भरलेल्या पाण्यात आंघोळीसाठी उतरला.
काही वेळानंतर अनिल बुडत असल्याचे त्याच्या मित्रांना दिसताच त्यांनी त्याच्या बचावासाठी आरडाओरडा करण्यास सुरवात केल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली. पाण्यात बुडत असलेला अनिल काही वेळानंतर पाण्याच्या आत गेला. चिरे खाणीत एक मुलगा बुडल्याचे समजताच आनंद लमाणी नावाच्या तरुणाने चिरे खणीच्या पाण्यात उडी मारून अथक प्रयत्न घेत अनिलला पाण्यातून बाहेर काढला. अनिलला बाहेर काढून वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता अशी माहीती पोलिसांकडून मिळाली.
वेर्णा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरित तेथे दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच १६ वर्षीय अनिलच्या मृतदेहाचा पंचनामा करून नंतर तो हॉस्पिसीयो इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला. वेर्णा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करित आहेत.