लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: काही पाश्चात्य शक्ती गोव्याबद्दल विकृत चित्र निर्माण करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. गोव्याची विशिष्ट संस्कृती व अस्मिता आहे. सरकार आणि गोव्यातील तमाम जनता ती जगासमोर आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
दोनापावला येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर संस्कृती भारती व डॉ. के. बी. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित 'गीतामृतम्' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दिल्लीतील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वारखेडी, स्वागत समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो राजभाषा उपसंचालक अनिल सामंत, आनंद देसाई, सुभाष देसाई आदी याप्रसंगी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा ही भोगभूमी नव्हे, तर कर्मभूमी असून दक्षिण काशी म्हणून हा प्रदेश ओळखला जातो. सांस्कृतिक, आध्यात्मिक, पर्यटन, आयुर्वेद, योग यातून गोव्याने हे दाखवून दिले आहे. जगातील सर्वात जास्त कुठल्या ग्रंथाचे भाषांतर झालेले असेल तर ते भगवद् गीतेचे झालेले आहे. भगवद् गीतेतील बारावा व पंधरावा अध्याय विद्यार्थ्यांना शिकवण्यात आला. राज्यात ठिकठिकाणी २२ हजार विद्यार्थ्यांनी गीतापठण केल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.