लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मी खुश व्हावे, असे मगोपने काहीही केलेले नाही; परंतु मी माझ्या परीने खुश आहे, असे म्हणत मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी आपले मन मोकळे केले आहे.
आरोलकर यांचे अलीकडे मगोप नेत्यांकडे फारसे चांगले संबंध राहिलेले नाहीत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांशी त्यांची सलगी वाढलेली आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांच्या या विधानाला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. आरोलकर म्हणाले की, आमदाराला खुश ठेवण्यासाठी खूप काही करावे लागते. पक्षाने ते केलेले नाही. पक्ष नेतृत्वावर ते समाधानी नाहीत, हेच यातून दिसून येते. नुकतेच एका मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यांवर प्रकाश टाकला.
जीत आरोलकर व पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर हे तसे जानी दोस्त आहेत. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीआधी अशी चर्चा होती की, दोघेही मगोपच्या तिकिटावर लढणार; परंतु अखेरच्या क्षणी आर्लेकर यांनी भाजपची कास धरली आणि आरोलकर मगोपच्या तिकिटावर लढले.
आरोलकर म्हणाले की, मगोप हा बहुजन समाजाचा पक्ष आहे. गोव्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या या पक्षाने बहुजन समाजाचा कैवार घेतला. या पक्षाचा आमदार म्हणून मला अभिमान आहे.
मुख्यमंत्र्यांकडे जास्त भेटीगाठी होतात याबाबत विचारले असता आरोलकर म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून सावंत हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांच्या खात्यांशी किंवा अन्य खात्यांशी संबंधित कामे त्यांच्याकडे घेऊन जाणे माझे कर्तव्य आहे आणि मी ते करतो. मी तटस्थ आहे. पेडणे तालुक्यात विकास प्रकल्प येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले; परंतु त्याचबरोबर वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांपासून तालुक्यातील लोक वंचित होता कामा नयेत, असे त्यांनी बोलून दाखवले.
राजकारण शिकवू नये
एका प्रश्नावर आरोलकर म्हणाले की, कोणी मला राजकारण शिकवण्याची गरज नाही. मी आईच्या पोटात असतानाच राजकारण शिकून आलो आहे. नवीन आमदार म्हणून कोणी मला कमी लेखू नये. आमदार म्हणून नवीन असलो तरी राजकारणात मी बऱ्याच वर्षांपासून आहे. पक्ष्याच्या डोळ्यावर कधी तीर धरावा, याचे ज्ञान मला आहे. मी कोणाचाही शत्रू नाही. मी तसा भावनिकही आहे.
कार्यकर्ते निर्णय घेतील
२०१७ ची विधानसभा निवडणूक मगोपच्या तिकिटावर लढणार की भाजपच्या, असा थेट प्रश्न केला असता आरोलकर म्हणाले की, याबाबतीत मी आताच काही सांगू शकत नाही, माझे कार्यकर्तेच काय तो निर्णय घेतील. २०२२ च्या निवडणुकीतही कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतरच मी मगोपची तिकीट घेतली.