गोवा हे एकमेव असे राज्य आहे, जिथे भ्रष्टाचार जवळजवळ शून्य आहे. हे दुसरे तिसरे कोणी नाही तर सीबीआय म्हणत आहे. इथल्या अधिकाऱ्यांकडे मोजून चार ते पाच प्रकरणे आहेत. गोव्यात गेल्या ५ वर्षांत लाच घेतल्याचे किंवा उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीची एकही तक्रार मिळाली नाहीय. म्हणजेच गोव्यात भ्रष्टाचार होतच नाहीय असा याचा अर्थ सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे.
गोव्यात सीबीआयला गेल्या काही वर्षांपासून भ्रष्टाचार होत असल्याचे सांगणारा एकही फोन आलेला नाही, ज्यामध्ये आमच्याकडून हस्तक्षेप करण्याची विनंती केली गेली असेल. ना जनेतकडून ना मीडियाकडून अशा तक्रारी मिळाल्या आहेत. गोव्यात भ्रष्टाचारच नसेल तर इथे आमची गरजच नाही, असे गोव्याचे सीबीआय एसपी आशिष कुमार यांनी सांगितले.
बुधवारी मीडियासोबत ते बोलत होते. एसपी आशिष कुमार यांनी सांगितले की, गेल्या एक वर्षात आम्ही केवळ तीन प्रकरणेची दाखल केली आहेत. यापैकी दोन प्रकरणे कॅनरा बँकेतील कर्ज फसवेगिरीशी संबंधीत आहेत. एकच प्रकरण उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीचा आहे. गेल्या चार वर्षांत आमच्याकडे एकही लाच घेतल्याची तक्रार आलेली नाही. शेवटची तक्रार 2018 मध्ये आली होती.