पणजी: स्मार्ट सिटीच्या नावाखाली सरकार पणजीतील खासगी बससेवा बंद करु पहात आहे. खासगी बसमालकांचा व्यवसाय हिरावून घेणारे हेच काय ते अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार ? असा संतप्त सवाल खासगी बसमालक संघटनेचे निमंत्रक सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली पणजीत आता सर्वत्र कदंबच्या इलैक्ट्रीक बसेस धावणार आहे. यावर आम्ही आक्षेप नोंदवला होता. मात्र वाहतूक खात्याने त्याची कुठलीही दखल घेतली नाही. मुख्यमंत्री सुध्दा त्यावर चर्चा करण्यासाठी आम्हाला वेळ देत नसल्याची टीका त्यांनी केली.
ताम्हणकर म्हणाले,की पणजीत कदंबच्या इलैक्ट्रीक बसेस सुरु केल्यास खासगी बसेस बंद होणार हे निश्चत आहे. मात्र जो पर्यंत वाहतूक खाते या बसेस बंद करा, असे सांगत नाही, तो पर्यंत आम्ही बसेस करणार नाही. सरकारच्या या निर्णयाला आमचा विरोध असला तरी आम्ही काहीच करु शकत नाही. कारण सरकारच्या विरोधात गेल्यास आमच्यावरच कारवाई होईल. पणजीत ७० खासगी बसेस कार्यरत असून त्यांच्यावर गदा येण्याची भीती असल्याचे त्यांनी सांगितले.