लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यातील अंगणवाडी सेविका मागील अनेक वर्षांपासून पगारवाढीची मागणी करीत आहेत. सरकार दरबारी मात्र त्याची अजूनही दखल घेतली नाही. सरकारने बालस्थ तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे आमचीसुध्दा दिवाळी आनंदात होऊन जाऊ दे, आम्हाला सुध्दा दिवाळीत पगारवाढ मिळणार का असा प्रश्न अंगणवाडी सेविका सरकारला विचारत आहेत.
गोव्यासारख्या लहान राज्यात १ हजार २६२ अंगणवाडी आहेत. यात काही मॉर्डन अंगणवाडीदेखील आहेत. या अंगणवाडींमध्ये १ हजार २४५ सेविका व साहाय्य काम करीत आहेत. अंगणवाडी ही केंद्र सरकारची योजना असून ती गोवा सरकारच्या महिला व बाल कल्याण खात्याअंतर्गत कार्यरत आहे.
सुरुवातीचा पगार १० हजार
राज्यातील अंगणवाडी सेविकांना सुरुवातीला प्रती महिना १० हजार रुपये तर अंगणवाडी सहायकांना ६ हजार रुपये इतका दिला जातो. त्यानंतर दर पाच वर्षांनी सेविका व सहायकांना त्यांच्या अनुभवा प्रमाणे पगारवाढ दिली जाते. अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या लहान मुलांच्या भरणपोषणवर त्या विशेष लक्ष देतात.
आम्हाला पेन्शन द्यावी...
अंगणवाडी कर्मचारी हे सरकारी कर्मचारीच आहे. त्यामुळे आम्हा- लादेखील पेन्शन असावे ही त्यांची अनेक वर्षाची मागणी आहे. किमान पेन्शन १० हजार मिळावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सध्या अंगणवाडी कर्मचायांना पेन्शन नसल्याने निवृतीनंतर अनेकांना त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
२५ हजार पगारवाढ करा
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार हा फारच कमी आहे. त्यामुळे सरकारकडून दिवाळीपूर्वी तरी पगारवाढ मिळावी. अंगणवाडी सेविकांना २५ हजार तर सहायकांना किमान पगार १८ हजार रुपये करावा, अशी मागणी ते करीत आहेत.
अंगणवाडी सेविकांचे निवृती वय ६० इतके आहे. मात्र त्यात दोन वर्षांनी वाढ करून ६२ करावे. सरकारला आम्ही तसे निवेदन दिले आहे. त्याची दखल घ्यावी. तत्कालीन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती ईराणी यांच्याकडेही हा विषय मांडला होता. - एक अंगणवाडी सेविका