पणजी : भाजपची उद्या येथे बैठक होणार आहे़ या बैठकीची राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे़ महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन्ही मंत्र्यांना हटवावे, अशी मागणी करणाऱ्या भाजप आमदारांचा दबाव गट निर्माण झाला आहे़ ही मागणी उद्याच्या (दि़३) बैठकीत होणार असल्याचे समजते़ मगोबरोबरची युती तोडावी यासाठी हा गट आग्रही असल्याची माहिती मिळाली़ संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली़ बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर तसेच कारखाने व बाष्पक मंत्री दीपक ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून काढावे, अशी या असंतुष्ट गटाची मागणी आहे़ या दोन जागांसह मिकी पाशेको यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या एका जागेवर भाजपच्या तीन आमदारांना मंत्री म्हणून संधी द्यावी, अशी मागणी हा गट करीत आहे़बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर भाजप आमदारांची कामे करीत नाहीत़ तसेच अपक्षांशी त्यांची ‘मिलीभगत’ असल्याचा आरोप होत आहे़ मंत्री दीपक ढवळीकर प्रसारमाध्यमांकडे भाजपच्या विरोधात नेहमीच टोमणे मारत असतात, अशी या गटाची तक्रार आहे़जिल्हा पंचायत निवडणुकीतही मगोमुळेच भाजपला दणका बसल्याची पक्षाच्या काही आमदारांची भावना आहे़ २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत मगोबरोबर युती नकोच़ त्यामुळे आताच या दोन्ही मंत्र्यांना वगळून भाजपच्या युवा आमदारांना मंत्रिपद द्यावे आणि जनतेसमोर पक्षाचा युवा चेहरा स्पष्ट करावा, असे या गटाला वाटते़ त्यासाठी आमदार सुभाष फळदेसाई आणि आमदार प्रमोद सावंत यांची नावे मंत्रिपदासाठी या गटाकडून चर्चिली जातात़(प्रतिनिधी)
भाजप बैठकीत आज काय होणार?
By admin | Published: May 03, 2015 1:17 AM