लोकमत न्यूज नेटवर्क पर्वरी: येथील गोमंतक मराठी अकादमीची अपूर्णावस्थेतील मराठी भवनाची वास्तू उद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या वर्षी अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांनी काही अंशी रंगरंगोटी करून घेतली होती. लवकरच अकादमीचे कामकाज सुरू करण्याचे आश्वासन त्यानी दिले होते. परंतु आता दहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या वास्तू केवळ वाचनालय आणि कार्यालय नावापुरते खुले असते. परंतु अन्य कोणतेही उपक्रम येथे राबवले जात नाहीत, याबाबत मराठीप्रेमी खंत व्यक्त करीत आहेत.
सभागृह तयार झालेले आहे. तेथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ शकते, परंतु अकादमीच्या कार्यकारिणीला यात काही रस असल्याचे दिसत नाही, असे मराठीप्रेमी म्हणतात. स्व. शशिकांत नार्वेकर, स्व. नारायण आठवले आणि असंख्य जाज्वल्य मराठीप्रेमींनी अक्षरश: झोळी फिरवून मराठी भवनासाठी निधी गोळा केला होता. तत्कालीन सरकारकडून काही निधी मिळवून भवनाच्या वास्तूचे बांधकाम सुरू केले. केवळ दीड दोन वर्षांत आकर्षक वास्तू आकारास आली. एकूण भवनाचा आवाका पाहता संपूर्ण देशातील एकमेव भव्य साहित्यिक वास्तू म्हणून कदाचित या वास्तूची गणना झाली असती. स्व. नार्वेकरांनी हेच स्वप्न पाहून भवनाची संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्याचे ठरविले होते आणि जिद्दीने असंख्य मराठीप्रेमींच्या मदतीने स्वप्न पुरे करण्याचे प्रयत्न केले.
भवनची वास्तू आकारास आली, परंतु नार्वेकरांच्या अकाली निधनानंतर या वास्तूचे बाकी काम रेंगाळले. त्या नंतरच्या कार्यकारिणीने वास्तूच्या बाकी कार्यकारिणीने वास्तूच्या बाकी राहिलेल्या बांधकामाकडे द्यावे तेवढे लक्ष दिले नाही.