नारायण गावस, पणजी: चिंबल जंक्शनवरील वाहतूक कोंडीतू्न सुटका कधी? असा प्रश्न आता वाहनचालकांना पडत आहे. फक्त सकाळ सायं कामाच्या वेळी नाहीतर भर उन्हात दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक काेंडीची रांग लागलेली असते. उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु असल्याने येथे वाहतूक काेंडी होत असते याचा त्रास भर उन्हात काेंडीत सापडलेल्या दुचाकीवाल्यांना होत आहे.
रायबंदरमध्ये स्मार्ट सिटीचे काम सुरु असल्याने हा रस्ता ठिकठिकाणी खाेदला आहे. त्यामुळे रायबंदर मार्गावरुन ओल्ड गोवाला जाणारी सर्व माेठी वाहने या महामार्गाने जातात. यातच या उड्डाण पुलाचे काम सुरु असल्याने वाहनाच्या रांगा लागत असतात. या ठिकाणी सिग्नल आहे तरी वाहनांची संख्या वाढल्याने सिग्नल पडल्यावर माेठी रांग लागत असते. आता भर उन्हाचा प्रचंड मारा बसत असल्याने याचा फटका वाहतूक कोंडीत सापडलेल्या दुचाकीवाल्यांना जास्त बसतो. येथे पुलाच्या बांधकामामुळे अगोदरच धूर पसरली आहे. त्यातच उष्णता आणि वाहतूक काेंडी यामुळे वाहनचालकांच्या नाकीनऊ येत आहेत.
रुग्णवाहीकांना होतो त्रास
या महामार्गावरुन गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना या वाहतूक काेंडीचा त्रास सहन करावा लागतो. लांबच लांब रांगा लागल्यावर रुग्णवाहीकांना जाता येत नाही. त्यामुळे रुग्णांना याचा फटका बसतो. तसेच कामगारांना कार्यालयात पाेहचताना उशीर होत आहे. महाविद्यालयातील तसेच शाळेतील वेळेत पाेहचत नाही सर्व बसेस या वाहतूक काेंडीत अडकून पडतात.
पुन्हा मेरशे सर्कल काेंडी
चिंबल जंक्शन कसेबसे पार केल्यावर पुन्हा वाहनचालकांना मेरशे सर्कलवर वाहतूक काेंडीचा सामना करावा लागतो. याठिकाणी सिग्नलवर किमान १० मिनिट तरी वेळ वाया जात असतो. वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहनचालकांचा वेळ वाया जातो. यामुळे लोकांना पणजीत शहरात येण्यासाठी वेळ वाया घालावा लागतो. या वाहतूक काेंडीतून सुटका मिळणार कधी असा प्रश्न लोकांना पडत आहे.