लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : किनारी भागातील आमदार या नात्याने आपला सनबर्नला पाठिंबा आहे. मात्र, तो कुठे आयोजित करावा हा निर्णय आयोजकच घेतील, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी सनबर्न हा उत्तर गोव्यातच व्हायचा परंतु आता तो दक्षिण गोव्यात होईल, अशी चर्चा आहे. सनबर्न कुठे आयोजित करावा, हा निर्णय पूर्णपणे आयोजक घेतील. त्यांना अजूनही जमिनीची एनओसी मिळालेली नाही. त्यानंतरच त्याबाबत निर्णय होईल. पर्यटन क्षेत्र हे गोव्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राला फटका बसू नये, असेच वाटते त्यांनी नमूद केले.
लोबो म्हणाले, की आपला स्वच्छ सनबर्नला पाठिंबा आहे. स्वच्छ म्हणजे जिथे त्याचे आयोजन सर्व कायदे व नियम पाळून होतात, तसेच त्यात कुठलाही गैरप्रकार असू नये अशा महोत्सवाला किनारी भागातील आमदार या नात्याने आपला सनबर्नला निश्चितच पाठिंबा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने तो व्हावा, असेच आपल्याला वाटते त्यांनी नमूद केले.
पर्यटकांची छळवणूक थांबवण्याची मागणी
कळंगुट, कांदोळी या भागांमध्ये येणाऱ्या पर्यटकांना पोलिस विनाकारण थांबवत असल्याने आपण याप्रश्नी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर हे प्रकार थांबविले आहे. पर्यटकांनी जिथे खरेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असेल तेथेच पोलिस त्यांना थांबवून दंड ठोठावत आहेत. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने येथे पर्यटक येतात. मात्र, विनाकारण पोलिस वाहने थांबवून दंड ठोठावत असल्यास ती सतावणूक होते, असेही लोबो यांनी सांगितले.