लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: थंडीचे दिवस मागे पडले आणि उन्हाळ्यातील सूर्याने उष्मा वाढवण्यास आरंभ केला आहे. उष्मा वाढला की घशाला कोरड पडू लागते. कोरड वाढली की तहान भागवण्यासाठी पाण्याची आठवण येते. पाणी म्हटले की फ्रिजमधील की घराबाहेर असल्यास थंडगार पेय खरेदी करून पिऊन तहान भागवली जाते.
घटाघटा पाणी पिऊनसुद्धा तहान मात्र भागत नाही. उलट जास्त पाणी प्यावेसे वाटते. अशावेळी माठातल्या पाण्याची सर फ्रिजमधील पाण्याला कशी येणार. माठातले पाणी पिल्यावर नक्कीच तहान दूर होण्यास मदत होत असते, तसेच माठातल्या पाणी आरोग्यासाठी बरेच लाभदायी ठरत असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, माठातील पाणी शरिरासाठी अत्यंत योग्य आहे. माठातले पाणी पिल्यामुळे कोणत्याही प्रकाराचे त्रास होत नाही. नैसर्गिकरित्या पाणी स्वच्छ करण्याची प्रक्रिया माठात होते.
चार तासांत होतेय पाणी शुद्ध
तज्ज्ञांच्या मतानुसार माठात ४ तासांपेक्षा जास्तवेळ पाणी राहिल्यास ते नैसर्गिकदृष्ट्या शुद्ध होत असते. याचे कारण म्हणजे माठातील मातीमध्ये नैसर्गिकरित्या पाण्यातील दूषित घटक शोषून काढून पाणी शुद्ध करण्याची क्षमता असते.
४५० रुपयांपासून विक्री
म्हापशातील प्रसिद्ध अशा बाजारपेठेत गेल्यावर्षी साधारण लहान आकाराच्या माठाची किंमत ३०० रुपयांपासून सुरु होत होती. यंदा मात्र त्यात अंदाजित ५० टक्क्यांनी वाढ होऊन माठ ४५० रुपयांपासून विकला जातो. मोठ्या आकाराचे माठ अंदाजे ७०० रुपयांना विकले जात आहेत.
आरोग्याच्या दृष्टीने माठच योग्य
माठातले पाणी नैसर्गिकरित्या थंड ठेवले जाते, नैसर्गिकरित्या पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. उष्माघातापासून बचाव होण्यास मदत होते, घशावर परिणाम होत नाही, अॅसिडिटी दूर होण्यास मदत होते. या विविध कारणास्तव माठातील पाणी पिणे लाभदायी असते.
- फ्रिजमधील थंड पाणी पिल्यास आपण अनेक समस्यांना निमंत्रण देऊ शकतो.
- अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यात घसा दुखणे, घशाचा संसर्ग, खोकला, ताप, डोके दुखणे बद्धकोष्ठता, प्रतिकार शक्ती कमी होणे, यांसारखे प्रकार होऊ शकतात.
- बाहेरील उष्मातून घरात प्रवेश केल्यानंतर लगेचच फ्रिजमधील पाणी पिल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
- फ्रिजमधील पाणी जरी थंड असले तरी त्याचे तापमान अतिकमी असल्यामुळे शरीरात कफ वाढून सर्दीचा त्रास जास्त होऊ शकतो. माठात ठेवलेले पाणी हे मातीचे बनलेले असल्यामुळे आयुर्वेदानुसार हे पाणी शरीरास थंडावा देतेच. पण तहान शमवते म्हणून गरम पाणी माठात ठेवून ते गार होईपर्यंत ठेवावे व नंतर त्या वेळेस असे केल्याने आपल्याला थंडावा ही मिळतो आणि आपली तहानही भागते. - डॉ. आदित्य बर्वे, आयुर्वेदिक तज्ज्ञ
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"