पणजी : स्वप्न रंगवताना वास्तवाचे भान ठेवणे तेवढेच गरजेचे आहे, असा उपरोधिक सल्ला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सरकारला काल मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या राज्य अर्थसंकल्पावरून दिला आहे.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले की, "स्वप्नातले मायाजाल तयार करण्यासही 'मायेची' गरज लागते. 'माया' म्हणजे पैसा कुठून येणार याची कुठलीच माहिती या अर्थसंकल्पात नाही. वास्तवापेक्षा वेगळेच आर्थिक चित्रण या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प वास्तववादी नाही आणि जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे."
दरम्यान, साधनसुविधा निर्माणावर भर असलेला व 21 हजार 56 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतुद असलेला 2020-21 सालासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केला. अबकारी करासह स्टॅम्प ड्युटी वाढवत मुख्यमंत्र्यांनी थोडी करवाढ केली आहे पण सामान्य माणसावर जास्त बोजा टाकलेला नाही. 353.61 कोटींचा (अतिरिक्त महसुल) हा शिलकी अर्थसंकल्प आहे. एकूण 1 हजार 200 पोलिसांची भरती करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पातून केली.