समीर नाईक, पणजी: ऐ वतन मेरे वतन हा चित्रपट प्रेरणा देणारा चित्रपट आहे. सत्य घटनांवर आधारित असा हा चित्रपट असून हा चित्रपट तयार करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पुढील वर्षी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होईल, अशी माहिती प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहर यांनी दिली. ५४व्या आंचिममध्ये ऐ वतन मेरे वतन या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या इन कन्व्हर्सेशन सत्रात बोलताना करण जोहर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत चित्रपटात मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री सारा अली खान, फिल्ममेकर कन्नन अय्यर, निर्माता अपूर्वा मेहता, प्राईम व्हिडिओच्या अपर्णा पुरोहित उपस्थित होते.
ऐ वतन चित्रपटात भावनांचा संगम आहे. ऐतिहासिक चित्रपटात तर संशोधन, तत्वे सांभाळूनच चित्रपट तयार करणे महत्वाचे आहे. तरच तो चित्रपट मनात राहतो. हा चित्रपट मनापासून तयार केलेला चित्रपट आहे असेही जोहर यांनी यावेळी सांगितले.
हा चित्रपट अनेक स्वातंत्र्यसैनिकांवर आधारित असून यातील उषा हे पात्र शौर्याचे प्रतिक असून जे प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. असे अनेक स्वातंत्र्यसैनिक आहेत ज्यांची कहाणी अजून कुणालाच माहिती नाही अशा शूरवीरांची कथा सांगणे आवश्यक आहे. त्यांची प्रेरणा प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. या चित्रपटाचा आत्मा खूपच सुंदर आहे अशी माहिती अभिनेत्री सारा अली खान यांनी दिली.
सारा अली खान उषाबेन मेहता यांच्याशी प्रेरित असलेल्या पात्राची भूमिका करत आहे. भारत छोडो आंदोलनात ज्या काही खऱ्या घटना घडल्या त्याबद्दल आणि काही काल्पनिकदृष्ट्या मांडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पुरुष स्वातंत्र्य सैनिकांबाबत मोठ्या प्रमाणात चित्रपट आलेत. परंतु महिला स्वातंत्र्यसैनिकांबाबत अजूनही चित्रपट कमी प्रमाणात आहेत अशी खंत कनन अय्यर यांनी व्यक्त यावेळी केली.