म्हापसा : माजी मंत्री बाबू आजगावकर यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून मगो पक्षात प्रवेश केल्यानंतर पेडणे मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर दावा करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या मनातील चलबिचल वाढली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी तसेच उमेदवारी कोणाला द्यावी, यावर तोडगा काढण्यासाठी धारगळ पंचायत सभागृहात काँग्रेस कार्यकर्त्यांची रविवारी संध्याकाळी चार वाजता बैठक बोलावली आहे. दोन दिवसांपूर्वी कॉँग्रेसतर्फे पेडणे मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीला पक्ष निरीक्षक चेल्लाकुमार यांच्या बरोबर डॉ. प्रमोद साळगावकर तसेच इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत आजगावकर यांनी पक्ष सोडल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती साळगावकर यांनी दिली. या बैठकीदरम्यान काही इच्छुकांनी कार्यकर्त्यांची पुन्हा बैठक घेण्याची मागणी केली होती. बैठकीनंतर या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी धारगळ येथे बैठक होणार आहे. बैठकीला प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो, विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे, डॉ. प्रमोद साळगावकर तसेच सेवा दल अध्यक्ष शंकर किर्लपालकर उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
पेडणेतील काँग्रेसची उमेदवारी कोणाला?
By admin | Published: December 31, 2016 3:18 AM