सद्गुरू पाटील/ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 2 - केवळ साडे पंधरा लाख लोकसंख्या आणि अकरा लाख दहा हजार मतदार असलेल्या गोव्यात सत्ता कोणाची येईल, हा राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनाही उत्कंठा लागून राहिलेला प्रश्न आहे. उद्या, शनिवारी गोवा विधानसभेच्या चाळीस जागांसाठी निवडणूक होत आहे. एकूण २५१ उमेदवारांचे भवितव्य ११ लाख मतदार ठरवतील.भारतीय जनता पक्ष २०१२ पासून गोव्यात सत्तेत आहे. काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. केंद्रात आणि गोव्यातही सत्तासूत्रे हाती असूनही भाजपला गोवा विधानसभा निवडणुकीत खूप संघर्ष करावा लागला. भाजप विधानसभेच्या चाळीसपैकी ३६ जागा, काँग्रेस ३७ तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष-शिवसेना-गोवा सुरक्षा मंच युती ३६ जागा लढवत आहे. या वेळी प्रथमच आम आदमी पक्ष गोवा विधानसभा निवडणूक लढवत आहे. एकूण ३९ उमेदवार ‘आप’ने उभे केले आहेत. या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, गोवा विकास पक्ष, गोवा सुराज पक्ष अशा काही पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरवलेत. बारापेक्षा जास्त राजकीय पक्ष रिंगणात असले तरी, भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना बहुतेक मतदारसंघांमध्ये आहे. काही मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती आहेत.लक्ष्मीकांत पार्सेकर, प्रतापसिंग राणे, लुईझिन फालेरो, रवी नाईक, दिगंबर कामत आणि चर्चिल आलेमाव असे सहा आजी-माजी मुख्यमंत्री निवडणूक लढवत आहेत. पार्सेकर व फालेरो यांना जिंकण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. गोव्यात २४ टक्के ख्रिस्ती धर्मीय मतदार आणि तीन टक्के मुस्लीम धर्मीय मतदार आहेत. सुमारे साडेपाच लाख मतदार हे युवक आहेत. पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यांमधून युवकांना आणि महिलांना जास्त आश्वासने देण्यावर भर दिलेला आहे. रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांपैकी ६० टक्के उमेदवार हे शिक्षित व उच्चशिक्षित आहेत. उर्वरित उमेदवार अर्धशिक्षित आहेत. एकूण ३६ उमेदवारांच्या नावे सुमारे चारशे कोटींची मालमत्ता आहे. सुशिक्षित आणि आधुनिक गोव्यातील ३८ उमेदवारांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी आहे. त्यापैकी एकोणीस उमेदवारांविरुद्ध गंभीर गुन्हे नोंद झालेले आहेत. ६२ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर, नितीन गडकरी, स्मृती इराणी, अनंतकुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदींच्या गोव्यात अनेक जाहीर सभा पार पडल्या. पंधरा दिवस देशभरातील दिग्गज नेत्यांच्या भाषणांनी गोवा ढवळून निघाला.सत्तेवर आल्यानंतर युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन बहुतेक राजकीय पक्षांनी दिले आहे. निवडणूक आचारसंहितेच्या काळात आचारसंहिता भंगाचा प्राथमिक ठपका केजरीवाल व मनोहर पर्रीकर यांच्यावर आला. दोघांनाही आयोगाने नोटीस पाठवली व त्यापैकी केजरीवाल यांच्याविरुद्ध पोलिसांत एफआयआरही नोंद झाला. गोवा विधानसभा निवडणुकीत या वेळी प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपविरुद्ध दंड थोपटले आहेत. बंडखोर संघचालक सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते भाजपविरुद्ध काम करत आहेत. गोवा मुक्तीनंतरच्या पन्नास वर्षांच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. वेलिंगकर यांच्या संघाने शिवसेना व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची साथ दिली आहे. संघाचे एकही मत भाजपला मिळणार नाही, असे वेलिंगकर यांनी म्हटले आहे. मात्र, नागपूरच्या संघाशी गोव्यातील जो संघ संबंधित आहे, तो संघ भाजपसोबतच आहे, असा दावा संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी केला आहे. इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करण्याची ग्वाही देऊन भाजपने आम्हाला फसवले व त्यामुळे आयुष्यात प्रथमच भाजपविरुद्ध लढावे लागत असल्याचे वेलिंगकर यांचे म्हणणे आहे.या वेळी पर्रीकर केंद्रात मंत्री असले तरी, त्यांनाच भावी मुख्यमंत्री म्हणून निवडणूक प्रचार काळात भाजपने प्रोजेक्ट केले. विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा चेहरा भाजपने पुढे केला नाही. उद्या शनिवारी गोव्यातील एकूण बाराशे मतदान केंद्रांवरून मतदानाची प्रक्रिया पार पडेल. हजारो सरकारी कर्मचारी मतदान प्रक्रियेच्या ड्युटीवर आहेत. गोवाभर कडक सुरक्षा ठेवली गेली आहे. गोव्याच्या सीमेवर अबकारी, वाणिज्य कर आणि प्राप्ती कर खात्याचे अधिकारी गस्त ठेवून आहेत. गेल्या आठ दिवसांत दीडशेपेक्षा जास्त मालवाहू वाहने ताब्यात घेऊन शासकीय यंत्रणेने कोट्यवधींचा माल जप्त केला आहे. तसेच काही कोटींची दारू गोवा-कर्नाटक आणि गोवा-महाराष्ट्राच्या तपास नाक्यांवर पकडली गेली आहे. भाजपला लोक पुन्हा सत्ता देतील, असा विश्वास पर्रीकर यांनी व्यक्त केला. मात्र, भाजप सरकारने लोकांना दिलेली आश्वासने यापूर्वी पाळली नाहीत व त्यामुळे लोक भाजपला नाकारतील, असे काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
गोव्यात सत्ता कुणाची ?
By admin | Published: February 02, 2017 7:31 PM