कौन बनेगा खासदार? उद्या निकाल; मतमोजणीसाठी २४४१ कर्मचारी तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2024 08:16 AM2024-06-03T08:16:42+5:302024-06-03T08:17:40+5:30

एक्झिट पोलने दोन्ही जागांवर विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे भाजप गोटात उत्साह पसरला आहे.

who will become mp for goa lok sabha election 2024 results tomorrow | कौन बनेगा खासदार? उद्या निकाल; मतमोजणीसाठी २४४१ कर्मचारी तैनात

कौन बनेगा खासदार? उद्या निकाल; मतमोजणीसाठी २४४१ कर्मचारी तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : लोकसभा निवडणूक मतमोजणीचे काउंटडाउन सुरू झाले असून, एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार की, जनता ईव्हीएममधून वेगळाच कौल देणार, याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. उद्या मंगळवारी मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारी १ वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, एक्झिट पोलने दोन्ही जागांवर विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे भाजप गोटात उत्साह पसरला आहे.

दक्षिण गोव्यात भाजपच्या पल्लवी धेपे की इंडिया आघाडीचे वीरियातो फर्नांडिस हे बाजी मारणार, यावरून उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. उत्तर गोव्यात भाजपचे श्रीपाद नाईक डबल हॅ‌ट्ट्रिक करतात का? याबाबत उत्सुकता ताणली आहे. काही ठिकाणी कोण बाजी मारेल, याबाबतही पैजा लागल्या आहेत.
निवडणूक आयोगाने मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. पणजी व मडगाव अशा दोन केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. 

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आल्तिनो येथे पॉलिटेक्निक महाविद्यालय इमारतीत, तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोंब, मडगाव येथे दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स इमारतीत होणार आहे.
लोकसभा उत्तर गोवा मतदारसंघाची ईव्हीएम आल्तिनो येथे मल्टिपर्पज सायक्लॉन शेल्टर इमारतीत स्ट्रॉग रूममध्ये तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाची ईव्हीएम कोंब, मडगाव येथे दामोदर वाणिज्य कॉलेजमध्ये स्ट्रॉग रूममध्ये ठेवलेली आहेत. मतमोजणीपूर्वी ती कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात आणली जातील.

दोन्ही केंद्रांवर सज्जता

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मडगावच्या मतमोजणी केंद्रावर १३०२ कर्मचारी, तसेच सुरक्षा बंदोबस्तासाठी ६५१ पोलिस, तर पणजीतील केंद्रावर ११३९ कर्मचारी व सुरक्षा बंदोबस्तासाठी ७०६ पोलिस तैनात आहेत.

सात शाळांना सुटी जाहीर

शिक्षण खात्याने जारी केलेल्या आदेशानुसार दि. ४ रोजी निकालाच्या दिवशी मडगाव येथील आरएमएस हायरसेकंडरी, दामोदर हायस्कूल, दामोदर हायरसेकंडरी, महिला नूतन हायस्कूल, पॉप्युलर हायस्कूल, लोयोला हायस्कूल व फातिमा कॉन्वेंट ही विद्यालये बंद राहतील. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले.

गोव्यातील दोन्ही जागा भाजपला; केंद्रातही ४०० पार : मुख्यमंत्री

अधिकांश टीव्ही चॅनल्सनी एक्झिट पोलमध्ये एकसारखेच अंदाज वर्तवविले आहेत. एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा आमचा ठाम विश्वास असून गोव्यात दोन्ही जागांवर भाजप उमेदवार विजयी होतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. एक्झिट पोलच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी वरील भाष्य केले. भाजपने या निवडणुकीत चांगली कामगिरी बजावल्याचे ते म्हणाले.
 

Web Title: who will become mp for goa lok sabha election 2024 results tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.