सारीपाट: श्रीपाद की खलप? भाजपाचे पारडे जड, काँग्रेसला करावी लागेल कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2024 10:17 AM2024-05-05T10:17:32+5:302024-05-05T10:18:38+5:30
श्रीपाद नाईक हे अजातशत्रू ते कुणाला दुखवत नाहीत.
सद्गुरू पाटील, निवासी संपादक, गोवा
सत्तरी व डिचोली हे तालुके आणि प्रियोळ मतदारसंघच यावेळी श्रीपादजींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पेडणे तालुक्यात रमाकांत खलप यांचा प्रभाव आहे. बार्देशमधील ख्रिस्ती मते किवा तिसवाडीतील अल्पसंख्यांकांची मते भाजपला मिळण्याची शक्यता नाही. तरीही शेवटी उत्तरेतही हिंदू मतदारच निर्णायक ठरणार आहेत.
श्रीपाद नाईक हे अजातशत्रू ते कुणाला दुखवत नाहीत. त्यांच्या स्वभावांत आक्रमकता नाही, भाषाही हिंसात्मक नाही. गोव्यात भाजप वाढला त्यात मनोहर पर्रीकर यांच्यासोबतच श्रीपाद नाईक यांचे योगदान आहे, हे विशेषतः २० च्या दशकातील लोकांना ठाऊक आहे. एकदा भाऊ खासदार होऊन दिल्लीला गोले आणि मग त्यांचे गोव्यातील पक्ष कार्य मर्यादित झाले. गोवा भाजपमधील एका वर्गाने पर्रीकर-श्रीपाद असा संघर्ष होऊ नये म्हणून काळजी घेतली. श्रीपादजींनी खासदार म्हणून गोवा-दिल्ली असे काम करत राहावे आणि पर्रीकर यांनी गोव्यात भाजपचे सर्वेसर्वा होऊन काम करावे असे ठरले होते. पर्रीकर खूप आजारी होते तेव्हा भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी श्रीपाद नाईक यांना गोव्यात मुख्यमंत्री म्हणून पाठवावे, असे ठरवले होते. मात्र ते सरकार विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर व रोहन खंवटे यांच्यावर त्यावेळी पूर्णपणे अवलंबून होते. विजय व सुदिन यांच्यात सीएम होण्यासाठी त्यावेळी स्पर्धा होती. श्रीपादभाऊंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास ते तयार नव्हते. मग पर्रीकरांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांना सीएम म्हणून स्वीकारावे लागले.
श्रीपाद नाईक हे अनेक वर्षे केंद्रात राज्यमंत्रिपदी राहिले. दिल्लीला कुणीही गोमंतकीय गेले की हक्काने भाऊंच्या सरकारी बंगल्यावर जातात, तिथे जेवतात, एक- दोन दिवस राहतात. काही वर्षांपूर्वी आम्ही काही पत्रकार दिल्लीला राज्यसभेत पर्रीकरांचे काम पाहण्यासाठी गेली होतो. पर्रीकरांचे संरक्षणमंत्री म्हणून साउथ ब्लॉकमधील कार्यालयही तेव्हा पाहिले होते. राज्यसभाही अनुभवली त्यावेळीच श्रीपाद नाईक यांचा दिल्लीतील बंगला पाहण्याची संधी मिळाली होती.
श्रीपाद नाईक यांचे गुडवील असल्यानेच अनेक वर्षे ते निवडून येत राहिले. शिवाय भाजपचे उत्तरेतील मजबूत संघटन, कधी वाजपेयी तर कधी मोदी लाट, कधी पर्रीकरांचे परिश्रम तर कधी कार्यकर्त्यांचे जबरदस्त प्रयत्न यामुळे भाऊ निवडून आले. श्रीपाद नाईक आता शेवटची लोकसभा निवडणूक लढवत आहेत. पुढीलवेळी भाजपने एखादा तरुण उमेदवार द्यावा असे नाईक यांनी आहीरपणे यापूर्वी सूचवले आहे. भाऊंचे गुडवील आता उत्तर गोव्यात पणाला लागलेले आहे. पुन्हा पुन्हा श्रीपादच कशाला असे विचारणारे काही कार्यकर्ते भाजपमध्ये तयार झालेत. शिवाय लोकांमधूनही भाऊंना प्रश्न केले जात आहेत.
गेली पंचवीस वर्षे आमचे प्रश्न सुटले नाहीत, म्हादई पाणीप्रश्नी अन्याय झाला, गोठ्यातील युवकांना केंद्रीय आस्थापनांत नोकऱ्या नाहीत, भाऊंनी आमच्यासाठी कधी संघर्ष केला नाही; अशी खंत पेडाणे, बार्देश व अन्य काही तालुक्यांतील काही जणांनी व्यक्त केलीच, काही प्रश्नांना भाऊंनी समर्पक उत्तरेही दिली. अहो, मी बहुतांशकाळ मंत्रिपदी राहिल्याने मी लोकसभेत प्रश्न उपस्थित करू शकत नव्हतो, असे देखील श्रीपादींनी लोकांना सांगितले, अर्थात जनमानसात स्थिती कशी आहे, असंतोष किती आहे वगैरे गोष्टी भाजपच्या काही नेत्यांना कळून आल्या आहेत. पण उत्तर गोव्यात भाजप मजबूत आहे हे मान्य करावे लागेल.
२०१४ साली श्रीपाद नाईक २ लाख ३७ हजार ९०३ मते घेऊन जिंकले. काँग्रेसपेक्षा एक लाखाहून जास्त मते भाऊ उत्तरेत मिळवतात, २०१९ साली २ लाख ४४ हजार ८४४ मते घेऊन श्रीपादभाऊ जिंकले होते. ही मते काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा ८० हजार मतांनी जास्त होती. गेल्यावेळी श्रीपादींची लिड कमी झाली. मात्र तरीदेखील भाऊंना घाबरण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी उत्तरेत भाऊंसाठी खूप परिश्रम घेतले आहेत. सत्तरी व डिचोली हे तालुके आणि प्रियोळ मतदारसंघच यावेळी श्रीपादजींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पेडणे तालुक्यात रमाकांत खलप यांचा प्रभाव आहे. बार्देशमधील खिस्ती मते किंवा तिसवाडीतील अल्पसंख्यांकांची मते भाजपला मिळण्याची शक्यता नाही. तिथे खलपांना संथी आहे, पण हिंदू मतदारांमध्ये श्रीपाद नाईक यांना अजून संधी आहे.
भाजपकडे महिला शक्ती मोठी आहे हे मान्य करावे लागेल, भंडारी समाज बांधवांमध्ये दोन गट जरी असले व भाऊंवर काहीजण नाराज जरी झाले तरी, भाजपची यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळे भंडारी बांधवांपैकी बरीच मते नाईक यांना मिळत असतात. रवी नाईक किंवा गिरीश चोडणकर यांनी भाऊंविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवून पाहिली, पण ते खूप मतांनी हरले. रमाकांत खलपांनी काही ठिकाणी यावेळी निश्चितच आव्हानात्मक स्थिती निर्माण केलेली आहे, पण विषय केवळ श्रीपाद यांचा नाही. भाजप म्हणून आणि पंतप्रधान मोदी म्हणून जर पूर्ण निवडणुकीचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येईल की- श्रीपाद नाईक आतादेखील धोकादायक स्थितीत नाहीत. भाऊंना कंटाळलेला भाजप कार्यकर्ता शेवटी मोदी व आपला पक्ष याचा विचार प्रथम करतो व स्वतःच्या पक्षासाठी मत देतो.
गिरीश चोडणकर गेल्यावेळी खलपांपेक्षा जास्त सक्रिय होते पण तरीही ८० हजार मतांच्या फरकाने भाजप जिंकला होता, भाजपची बूथ यंत्रणा सक्षम आहे. शिवाय यावेळी मगो पक्ष आणि अपक्ष आमदारही भाजपसोबत आहेत. खलपांकडे हळदोणेचे एक आमदार कार्नुस फरैश आहेत. काँग्रेसची संघटना व कार्यकर्ते केठळ कागदोपत्री आहेत, निधी नसल्याने तो पक्ष मोठी सभा घेऊ शकलेला नाही. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या तोडीचे नेते गोव्यात आले नाहीत. बिचाऱ्या माणिकराव ठाकरे किंवा शशी थरूर यांच्या (लाघवी इंग्रजी) भाषणांना गोयकार किती प्रतिसाद देतील? तरी देखील यावेळी खलपांनी अनुकूल वातावरण तयार केले, कारण खलपांचे बोलणे प्रभावी आहे. खलपांच्या चेहन्यावरील हास्य मतदारांना आवडू लागलेय. त्यामुळेच म्हापसा अर्बन बँकेचा विषय सध्या भाजपला खूपच आवडू लागलाय, बँक लुटली असेच मुख्यमंत्रीही बोलतात. मग तुम्ही खलपांविरुद्ध एवढी वर्षे कारवाई का केली नाही? तुम्ही लूट आनंदाने पाहात होता काय की निवडणुकीपर्यंत थांबला होता असा प्रश्न येतोच. अर्थात हे सगळे मुद्दे वेगळे आहेत.
श्रीपाद नाईक डेंजर झोनमध्ये नाहीत याचे आणखी एक कारण म्हणजे यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोदींच्या विषयावर फूट नाही. संघाचे सगळे आजी-माजी स्वयंसेवक कार्यकर्ते यावेळी भाजपसोबत आहेत. प्रा. सुभाष वेलिंगकर यांनीदेखील होय, आमची सर्वांची मते यावेळी मोदीजींसाठीच असे काल जाहीर केले आहे.
महागाई, बेरोजगारी अशा विषयांवरून युवक अस्वस्थ आहेच, लोकांना उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर येण्यात इंटरेस्ट नाही. राजकीय नेत्यांची भाषणे व आश्वासने फसवीच असतात, असा लोकांचा घट्ट समज झालेला आहे. ख्रिस्ती मतदार तर यावेळी आक्रमक आहेत. यामुळे काही खिस्ती आमदारांची, यांची डाळ शिजेनाशी झाली आहे. जीत आरोलकर यांना काही खिस्ती धर्मगुरू सांगतात की तुम्ही विधानसभेवेळी कदाचित भाजपच्या तिकिटावर उभे राहिला तरी, आम्ही तुम्हाला मते देऊ पण आता आमच्याकडे मते मागू नका. ही लोकसभा निवडणूक आहे. दक्षिण गोव्यातही हाच अनुभव ख्रिस्ती मतदारांबाचत येतो. तरीही एक लक्षात ठेवावे लागेल की हिंदू मतदार हेच निर्णायक ठरणार आहेत. सर्व आजी-माजी मंत्र्यांना भाजपने कामाला लावले आहे. भाजपचे काही निर्णय पटले नाहीत तरी, त्यांच्या परिश्रमांना दाद द्यावी लागेल काँग्रेसचे आमदार फोडून, तो पक्ष खिळखिळा करून मग निवडणुकीत त्या पक्षाला आव्हान देताना भाजपला आणखी चेव चढलाय आम्हीच काँग्रेसचे आमदार फोडले असे सांगतानाही त्यांच्या काही नेत्यांना गैर वाटत नाही. स्थिती एवढ्यापर्यंत गेली आहे, पण लोकांसमोर पर्याय तरी कुठे आहे? आरजीचे मनोज परख निस्चितच उत्तर गोव्यात बन्यापैकी मते प्राप्त करतील, त्यांनीही खूप कष्ट घेतलेत. आरजीला मिळणारी मते ही केवळ काँग्रेसचीच असतील असे मात्र यावेळी उत्तर गोव्यात मुळीच मानता येणार नाही.
गृहमंत्री अमित शहा यांची परवा म्हापशात सभा झाली. त्या सभेसाठी भाजपच्याच काही आमदारांनी जास्त गर्दी आणली नाही. मोदीच्या सभेवेळी प्रचंड गर्दी दक्षिणेच्या आमदारांनी नेली होती. उत्तरेचे काही आमदार सभांसाठी गर्दी नेण्याबाबत मागे राहिले. अर्थात त्यामागे वेगळी कारणे असतील. मौदींच्या सभेला अजून लोक जास्त गर्दी करतात हेही गोव्यात सिद्ध झाले.
हे लक्षात ठेवा
२०१४ साली भाजपला उत्तर गोव्यात काँग्रेसपेक्षा एक लाखाहून जास्त मते मिळाली होती. २०१९ साली भाजपला काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा ८० हजार जास्त मते प्राप्त झाली होती. श्रीपाद नाईक यांची लिड कमी होईल पण ते डेंजर झोनमध्ये नाहीत, असे मानणारे हिंदू मतदार गोव्यात जास्त आहेत. भाजपसाठी सत्तरी, डिचोली हे तालुके, प्रियोळसारखा मतदारसंघ तसेच बार्देशचे म्हापसा व काही भाग मदतरूप करतील, म्हापशात गेली अनेक वर्षे भाजप कधी हरला नाही. काँग्रेससाठी मात्र ख्रिस्ती मतदार यावेळी आशेचा मोठा किरण आहेत, तिसवाडीत भाजपचे काही आमदार जास्त काम करत नाहीत पण त्यातून भाजपची जास्त हानी होणार नाही.