मडगाव - गोव्यातील सर्वात मोठे मच्छीमार्केट असलेले मडगावचे एसजीपीडीएचे होलसेल मार्केट हे यापूर्वी तेथील गलिच्छतेसाठी चर्चेत आले होते. मात्र हे मार्केट केवळ गलिच्छच नसून अत्यंत प्रदुषितही आहे. यावर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. या मार्केटातील सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात कॉलिफॉर्मचे अंश सापडले असून जीवघेणो ई कोलाय बॅक्टेरियाचाही अंश त्यात सापडला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने या मार्केटातील पाण्याचे नमुने तपासले असता, गटारातील पाण्यात 1.70 कोटी तर मासळीच्या कंटेनरमधील पाण्यात 5.40 कोटी प्रतिलिटर मिलिग्राम या प्रमाणात कॉलीफॉर्मचे अंश सापडले. त्याशिवाय मासळीच्या खोक्यात असलेल्या पाण्यात तब्बल 9.20 कोटी कॉलीफॉर्मचे प्रमाण सापडले. एवढेच नव्हे तर हे सांडपाणी ज्या साळ नदीत सोडले जाते त्या नदीतही प्रति लिटर मिलीग्राम 54,000 कॉलीफॉर्मचे प्रमाण सापडले आहे. त्याशिवाय या सर्व पाण्याच्या नमुन्यात ई कोलायचे प्रमाण असून आमोनिकल नायट्रोजन आणि फोस्फेट या घातक द्रव्याचाही अंश सापडला आहे.
मडगावातील एनजीओचे संजीव रायतुरकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाने या पाण्याचे नमुने घेतले होते. मंडळाने काढलेला निष्कर्ष पाहता हे मार्केट मासळी हाताळण्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे तर या पाण्यामुळे साळ नदीचे पाणीही मोठ्या प्रमाणावर प्रदुषित झाले आहे. या नदीतील पाण्यात फेसल कॉलीफॉर्मचे प्रमाण 22 हजार, आमोनिकल नायट्रोजनचे प्रमाण 0.51 तर फोस्फेटचे प्रमाण 0.232 (प्रति लिटर मिलीग्राम) एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर दिसून आले असून यासंबंधी तातडीने उपाययोजना हाती घेण्याची पाळी प्रशासनावर आली आहे.