पणजी: राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करताना महिलांना डावलणे हे एकप्रकारे त्यांचे खच्चीकरण करण्यासारखे आहे. त्यामुळे सरकारने या पुरस्कारांसाठी कुणी अर्ज केले होते हे जाहीर करावे अशी मागणी महिला साहित्यिक ज्योती कुंकळकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
राज्य सांस्कृतिक पुरस्कार हा महिलांना सुध्दा मिळावा असा कुठलाही निकष किंवा अट नाही अशी टीका कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केली आहे. त्यांचे हे विधान महिलांसाठी अपमानस्पद आहे. त्यांना सदर खुर्चीवर बसण्याचा कुठलाही अधिकार नसून त्यांना मंत्रीपदावरुन हटवावे अशी मागणीही यावेळी केली.
कुंकळकर म्हणाल्या, की कला व संस्कृती खात्याने १२ राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर केले. यापैकी एकही पुरस्कार महिला साहित्यिक किंवा कलाकाराला मिळाला नाही. याचाच अर्थ महिला या पुरस्कारासाठी सक्षम नाहीत ना ? मंत्री गावडे म्हणाले, की सदर पुरस्कारांसाठी हजारो अर्ज आले. ते चुकीची माहिती देत आहेत. प्रत्यक्षात १०० ते १२० अर्जच आले आहेत. जर त्यांच्या म्हणण्यानुसार हजारो अर्ज आले असतील, तर ते कुणी केले हे त्यांनी नावांसह जाहीर करावे त अशी मागणी त्यांनी केली.