लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : गणेशोत्सव जवळ आल्याने सार्वजनिक गणपती मंडळांची लगबग सुरू झाली आहे. सार्वजनिक मंडळांना उत्सवासाठी खूप आधीपासून तयारी करावी लागते. त्यासाठी सरकारच्या विविध विभागांकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. यामध्ये पोलिस, वीज खाते व पालिका अशा विविध घटकांचा समावेश आहे. त्यासाठीची धांदल आता सुरू होईल.
सार्वजनिक गणपती मंडळांना रस्त्यावर मंडप उभारणीसाठी नगरपालिकेकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. साऊंड, सुरक्षा व वाहतूक व्यवस्था हाताळण्यासाठी जिल्हाधि काऱ्यांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मंडपात लागणाच्या तात्पुरती वीज जोडणीसाठी पालिकेकडून नाहरकत दाखला सादर करावा लागतो.
कागदपत्रे काय लागतात?
सार्वजनिक गणेशोत्सवाला मंडप घालण्यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या लेटरहेडचा वापर करून मंडप उभारण्यासाठी नाहरकत दाखल्यासाठी अर्ज करावा लागतो.
वीज सवलत नाही
गणेश मंडळांना तात्पुरती वीज जोडणी दिली जाते. त्यांना विजेची सवलत नाही. उलट तात्पुरती वीज जोडणीसाठी युनिट दर जास्त असतात.
परवानगी अर्ज कसा व कोठे कराल?
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे जिल्हाधिकारी कार्यालयात साऊंडसाठी अर्ज करतात. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून एक कॉपी पोलिस स्थानकात येते. आम्ही सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक बोलावून त्यांना सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सांगण्यात येते तसेच इतर नियमांविषयी माहिती दिली जाते. - पोलिस अधिकारी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपती मंडप घालण्यासाठी आपले लेटरहेड वापरून त्यावर मंडप घालण्यासाठी नाहरकत दाखला देण्यासाठी पालिकेला पत्र सादर करावे लागते तसेच तात्पुरती वीज़ जोडणीसाठीही गणेश मंडळाने आपल्या लेटर हेडवरून अर्ज करावा लागतो. - पालिका अधिकारी