यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण गोव्यात अॅड. नरेंद्र सावईकर यांना अवघ्या काही मतदारांनी नाकारल्यामुळे अपयश स्वीकारावे लागले. यंदा निवडणुकीत पुन्हा तीच चूक घडू नये यासाठी व दक्षिण गोवा मतदारसंघात महिलांची संख्या जास्त असल्यामुळे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी पल्लवी धेपे यांना उमेदवारी दिली आहे.
निवडणुकीत दक्षिण गोव्यातून विजयी होण्याच्या उद्देशाने धेपे उतरले आहेत. लोक त्यांना स्वीकारतील की नाही यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस व आरजीचे युवा उमेदवार हेही रिंगणात उतरलेले आहेत. शिरोडा मतदारसंघामधील मतदार यंदाच्या निवडणुकीत कोणाला कौल देतील, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
भाजपच्या उमेदवार पल्लवी धेपो पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला दक्षिण गोव्यात हार पत्करावी लागल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा तीच चूक घड्डू नये यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबरच अन्य ज्येष्ठ नेत्यांनीही कंबर कसली आहे.
विशेषतः शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी शिरोडा मतदारसंघातील सर्व पंचायतीमध्ये पंच, सरपंच व अन्य कार्यकर्त्यांना घेऊन ठिकठिकाणी नागरिकांची गाठीभेटी व संवाद साधत आहे. ठिकठिकाणी कोपरा बैठकाही घेऊन नागरिकांमध्ये प्रचार करत आहे. घराघरांमध्ये जाऊन प्रचार करणे अशक्य असल्यामुळे गावागावांमध्ये जाऊन कोपरा बैठका, प्रचारसभातून लोकांची गाठीभेटी घेतल्या जात आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अनेकजण शिरोड्याचे उमेदवार शैलेश नाईक काय करणार व किती मते मिळवणार असे म्हणत होते. मात्र त्याने विधानसभा निवडणुकीत पाच हजारपेक्षा जास्त मते मिळवून सर्वांनाच चकित केले. त्याचप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही शिरोडावासी आरजीबरोबर राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
शिरोड्यात भाजपला आघाडी मिळावी यासाठी मंत्री सुभाष शिरोडकर दिवसरात्र मेहनत घेत आहेत. याचप्रमाणे सर्व पंचायतीच्या पंच सदस्य व सरपंच यांच्यासोबत प्रचार सभा, कोपरा बैठक सुरू आहेत. मागच्या निवडणुकीत शिरोड्यातील ख्रिस्ती समाज हा काही प्रमाणात 'आप'चे उमेदवार महादेव नाईक यांच्यासोबत तर काही ख्रिस्ती बांधव आरजीसोबत राहिले होते. भाजपचे कट्टर समर्थक भाजप उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्यासोबत राहिल्यामुळे विजय मिळवणे शक्य झाले. या लोकसभा निवडणुकीत ख्रिस्ती समाज कोणाबरोबर राहतील हे सांगणे कठीण झाले आहे.
मतदारसंघ विभागणार
मागच्या निवडणुकीत दक्षिण गोव्यात काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणले तरी त्यांनी जनतेसाठी कोणतेच काम केले नाही. त्यामुळे यंदा पुन्हा काँग्रेसचा उमेदवार निवडून आणावे की नाही याचा विचार करत आहेत. शिरोडा मतदारसंघातील मते भाजप आणि आरजीमध्ये विभागण्याची शक्यता आहे. असा सूर ऐकू येत आहे.
आरजीपीकडे आकर्षित
या मतदारसंघामध्ये काँग्रेस कार्यकर्त्याकडून काँग्रेसचे उमेदवाराबाबत प्रचार करण्यात कमी पडत आहेत. त्याचप्रमाणे लोकांची गाठीभेटी व संवाद साधताना दिसत नाही. आरजीपीचा उमेदवार लोकांशी सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांच्या विषयाला हात घालत आहे. गोवा आणि गोंयकारपण टिकवण्यावर जास्त भर देत असल्यामुळे अनेक युवक आरजीपीकडे वळताना दिसत आहेत. काही युवक प्रत्यक्षपणे पाठिंबा देत नसले तरी आरजीपीकडे आकर्षित झाले आहेत.