राजू नायक/हरमल ( उत्तर गोवा) - गोव्याला विदेशी नागरिक पर्यटक म्हणून हवे आहेत आणि अधिक खर्च करणा-या देशी पर्यटकांपेक्षा त्यांनाच येथे पसंती का दिली जाते हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अशा काही लोकप्रिय किना-यांना भेट दिलीच पाहिजे. गोव्यात उत्तर गोव्यातील कळंगूट, कांदोळी समुद्रकिनारे जास्त लोकप्रिय आहेत. कळंगूटला तर हमखास गर्दी असते. गोव्यात येणारा कोणताही पर्यटक कळंगूटला भेट दिल्याशिवाय आपले पर्यटन पूर्ण झाले असे मानत नाही.
मांदे्र, हरमल असे काही किनारे आहेत जे रशीयन, इस्त्रायली पर्यटकांनी आपले माहेरघर बनविले आहे. येथे त्यांच्या वास्तव्यांनी वेगळीच जीवनशैली निर्माण झालेली आहे. या किना-यावर ड्रग्ज मिळतात, रशियन माफिया वाास्तव्य करतो अशी टीका होत असली तरी वेगळ्या जीवनशैलीमुळे या किना-यांवर जोश आणि उत्साहाचे भरतेही आलेले असते. कारण संध्याकाळ पडू लागल्यानंतर विदेशींचे जथेच किना-यावर जमू लागतात. कोणी ड्रम्स आणतो, कोणी गीटार, सीतार आणि पाश्चात्य तालवाद्यांचे सूर उमटू लागतात आणि त्यावर पाय आपोआप थिरकू लागतात.
शेवटी शेकडो लोकांचा मिळून किनारी नाच सुरु होतो. त्यातून क्वचित एक वेगळे संगीत नृत्यही जन्माला येते. स्थानिक सांगतात विदेशी लोक कचरा करत नाहीत. त्यांनी आपल्या जीवनशैलीने या किना-यावर जान आणली आहे. १९७० च्या दशकात येथे हिप्पी येऊ लागले. त्यानंत २००० साली त्यांच्यावर निर्बंध आले. त्यांच्या रेव्ह पार्ट्यांनी किनाºयांना ग्रहणही लागले. परंतु आता स्वच्छंदी विदेशी पर्यटक आत्मशोधासाठी नवी यात्रा सुरु करताना दिसतो. तो स्वत:चा शोध घेताना कधी ध्यानाला बसतो कधी निवांत पडून राहतो तर कधी तलावात तरंगताना रममाण होतो.
येथे बरेचजण निवांतपणाच्या शोधात कायमची त्याठिकाणातीच झाली आहेत. त्यामुळे त्यांची मुले कोकणी बोलतात, स्थानिक शाळांमध्ये जातात. स्थानिकांचा त्यांना उपद्रव होत नाही. कधी-कधी देशी पर्यटक मात्र त्यांना त्रास देतात. त्यांची छायाचित्रे घेतात. लमाणी त्यांना वस्तू विकण्याच्या बहाण्याने सतावतात. स्थानिकांना जरी देशी पर्यटकांकडून पैसे खूप मिळत असले तरी ते खरी पसंती देतात ते अशा विदेशी पर्यटकांनाच. विदेशी पर्यटकांमुळेच हे किनारे ताजे, टवटवीत होतात असा सूर स्थानिक लोकांकडून ऐकायला मिळतो.